राज्याील वैद्यकीय महाविद्यालये व संलग्न रुग्णालयांमध्ये अनेक महागडी उपकरणे वापराविना पडून असल्याची जोरदार टीका विरोधी तसेच सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी केल्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी अनेक  ठिकाणी उपकरणे चालविण्यासाठी कर्मचारी व डॉक्टर नसल्याचे सांगत यापुढे उपकरण खरेदी व पदनिर्मितीचे धोरण तयार केले जाईल असे जाहीर केले.
पुणे येथील ससून रुग्णालयासह राज्यातील अनेक रुग्णालयांमध्ये एमआरआय, सीटी स्कॅनसह अनेक उपकरणे एकतर नादुरुस्त तरी आहेत किंवा वापराविना पडून असल्याचा प्रश्न विधानसभेत आमदार जगदीश मुळीक यांच्यासह अनेक आमदारांनी उपस्थित केला.
उत्तरादाखल विनोद तावडे म्हणाले की, काही प्रकरणात उपकरणांची आधी खरेदी झाली असून तंत्रज्ञ अथवा डॉक्टरांअभावी उपकरणे पडून राहतात. यातील विसंगती लक्षात घेऊन उपकरण खरेदी करण्यापूर्वी पदांची निर्मिती करण्यासंदर्भातील धोरण तयार करण्यात येईल तसेच नादुरुस्त उपकरणे दुरुस्त करण्यात येतील. काही वेळा शासकीय सेवेतील डॉक्टर नियमबाह्य़ खाजगी व्यवसाय करत असल्याचे आढळून येत असून अशा डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्यात येईल असेही तावडे म्हणाले.

चेंबूर येथील प्रदूषणकारी कारखान्यांवर कारवाई
चेंबूर परिसरातील संडपाण्याचे तसेच वायूप्रदुषण करणाऱ्या कारखान्यांची तपासणी करून ज्या कारखान्यांमधून प्रदुषण होत असेल त्यांच्यावर तसेच प्रदुषण करणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सांगितले.