थकित कर्जप्रकरणी राधाकृष्ण विखे-पाटील यांचा गौप्यस्फोट

कामगारमंत्री संभाजी निलंगेकर-पाटील यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभय दिले असले तरी थकीत कर्जाच्या रक्कमेबाबत तडजोड करण्याची तयारी दर्शविणारे पत्र निलंगेकर यांनी बँकेला लिहिल्याचा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. यावरून हे मंत्री स्वच्छ कसे, असा सवालही त्यांनी केला.

कलंकित मंत्र्यांचा विषय विखे-पाटील यांनी विधानसभेत पुन्हा उपस्थित केला. निलंगेकर, जयकुमार रावळ किंवा रवींद्र चव्हाण या मंत्र्यांच्या विरुद्ध गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. तरीही मुख्यमंत्र्यांनी त्यांना अभय कसे दिले? यावरून भ्रष्ट मंत्र्यांना मुख्यमंत्री पाठीशी घालीत असल्याचा आरोप विखे-पाटील यांनी केला.

आजोबा (शिवाजीराव निलंगेकर-पाटील) आणि नातू (कामगारमंत्री संभाजी निलंगेकर-पाटील) यांच्या वादातून हे प्रकरण घडल्याचा युक्तिवाद मुख्यमंत्र्यांनी केला होता. पण हा वारसाहक्काचा वाद नाही. उलट मंत्र्यांनी कागदपत्रांमध्ये खाडाखोड करून भलतीच जमीन कर्जासाठी गहाण ठेवल्याचा आरोप विखे-पाटील यांनी केला. तसेच स्वत:च्या लेटरहेडवर संभाजी निलंगेकर-पाटील यांनी बँकेला पत्र लिहून ४० कोटींच्या थकीत रक्कमेबाबत तडजोड करण्याची तयारी दर्शविली आहे. या  घोटाळ्याशी निलंगेकर यांचा काहीही संबंध नाही, असा दावा मुख्यमंत्री करतात, मग त्यांनी बँकेला पत्र का लिहिले, असा प्रश्न विखे-पाटील यांनी उपस्थित केला. सीबीआयने संभाजी निलंगेकर यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. यापेक्षा आणखी काय पाहिजे, असेही ते म्हणाले.

पर्यटनमंत्री जयकुमार रावळ यांना वाचविण्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी दादासाहेब रावळ बँकेच्या घोटाळ्याचा तपास विशेष चौकशी पथकाकडून काढून सीआयडीकडे सोपविला आहे. रावळ यांच्यावरही गंभीर स्वरूपाचा आरोप असल्याचे विखे-पाटील यांनी सांगितले.

स्पर्धकांचा राजीनामा, स्वकीयांना माफीनामा

सत्तेचा दुरुपयोग केल्याचा आरोप झालेल्या एकनाथ खडसे यांचा राजीनामा घेण्यात आला.अन्य कलंकित मंत्र्यांना मात्र मुख्यमंत्री फडणवीस अभय देत आहेत. यावरून राजकीय स्पर्धकांचा राजीनामा आणि स्वकीयांना मात्र माफीनामा देत आहेत, अशी टीका विखे-पाटील यांनी केली.