उद्यापासून तुरळक सरींचा अंदाज

गेले तीन आठवडे विश्रांती घेतलेल्या पावसाने आता पुन्हा बरसण्यास सुरुवात केली असून मुंबईसह कोकण व विदर्भात दोन दिवसांपासून तुरळक सरी कोसळत आहेत. मध्य प्रदेश ते बंगालच्या उपसागरापर्यंत असलेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे विदर्भात पावसाने पुनरागमन केले आहे. हीच परिस्थिती कायम राहणार असून उद्या, मंगळवारपासून मराठवाडय़ातही पावसाचे पुनरागमन होईल, असा अंदाज केंद्रीय वेधशाळेने वर्तवला आहे.

मुंबई, अलिबाग, उरण आणि हर्णे या ठिकाणी गेल्या दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. रविवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांच्या नोंदीनुसार मुरुड व उरण येथे ८० मिलिमीटर पाऊस पडला. मुंबईत सांताक्रूझ येथे ५२ मिमी पावसाची नोंद झाली. विदर्भातही बहुतांश ठिकाणी तुरळक व काही ठिकाणी पावसाच्या मध्यम सरी आल्या. सरासरीपेक्षा २७ टक्क्य़ांहून कमी पाऊस झालेल्या भंडारा येथे गेले तीन दिवस पाऊस येत असल्याने स्थिती सुधारण्याची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्रातील धुळ्यातील स्थिती मात्र जैसे थे आहे. धुळ्यात सरासरीपेक्षा २५ टक्के कमी पाऊस पडला. आताही धुळ्यात पावसाने दडी मारली असून पुढील पाच दिवसांचा अंदाज पाहता धुळ्यात पाऊस पडण्याची शक्यता कमीच आहे.

दरवर्षी दुष्काळाच्या छायेत असलेल्या मराठवाडय़ातील बहुतांश जिल्ह्य़ातील स्थिती दरवर्षीपेक्षा बरी असली तरी ऑगस्टमध्ये पाऊसच झाला नसल्याने हे जिल्हे पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

येत्या दोन दिवसांत मराठवाडय़ातही पावसाच्या सरी अपेक्षित आहेत. सोमवारी व मंगळवारी मराठवाडय़ातील बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या सरी येतील, असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे. बुधवारपासून मात्र पावसाचा जोर कमी होईल, असेही वेधशाळेतर्फे सांगण्यात आले आहे.