हिट अँड रन प्रकरणात सलमान खानला सत्र न्यायालयाने दोषी ठरवून त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनाविण्यात आल्यानंतर गुरूवारी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी त्याच्या निवासस्थानी जाऊन सलमान खानची भेट घेतली. राज ठाकरे यांचे सलमान आणि त्याचे वडील सलीम खान यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळेच राज ठाकरे आज सकाळी वांद्रे येथील सलमानच्या निवासस्थानी दाखल झाले.  मात्र, राज यांच्या या भेटीने आता नवे वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. न्यायालयाने काल दिलेल्या निकालानंतर सलमान खान हा आता आरोपी राहिलेला नसून दोषी ठरला आहे. त्यामुळे एखाद्या राजकीय पक्षाच्या प्रमुखाने अशाप्रकारे जाहीरपणे न्यायालयाने दोषी ठरवलेल्या व्यक्तीची भेट घेणे म्हणजे त्याच्या कृत्याचे समर्थन करण्याचा प्रकार असल्याची प्रतिक्रिया अनेकजणांकडून व्यक्त होते आहे.
तर दुसरीकडे अभिनेता आमीर खाननेही गुरूवारी सलमानची भेट घेतली. सलमान आणि आमीरची मैत्री बॉलीवूडमध्ये सर्वश्रूत आहे. १९९४ साली आलेल्या ‘अंदाज अपना अपना’ या चित्रपटातील सलमान आणि आमीरची जोडी आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. त्यानंतर गेली अनेक वर्षे या दोघांनी एकमेकांमधील मैत्री जाणीवपूर्वक जोपासली आहे. त्यामुळेच सलमानच्या आयुष्यातील कठीण प्रसंगी त्याला धीर देण्यासाठी आमीर खान आज मुंबईतील सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट या निवासस्थानी पोहचला.
तत्पूर्वी गेल्या दोन दिवसांमध्ये बॉलीवूड किंग शाहरूख खानसह अनेक बड्या तारे-तारकांनी सलमान खानची भेट घेतली. शाहरूखने मंगळवारी मध्यरात्रीनंतर सलमानच्या निवासस्थानी जाऊन सुमारे तासभर त्याच्याशी चर्चा केली होती. बुधवारी उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर सलमान खान जेव्हा घरी आला तेव्हा राणी मुखर्जी, सोनाक्षी सिन्हा, बिपाशा बसू , सुनील शेट्टी असे अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी सलमानला भेटायला आले होते.

[poll id=’940′]