करिअरची संधी घेण्याचे रेखा चौधरी यांचे ‘व्हिवा लाऊंज’मध्ये आवाहन
आपले शरीर हे एक मंदिर आहे, या मंदिराचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी आपली असते. मात्र, काही ना काही कारणाने आपल्या शरीर, मनाची काळजी आपण घेऊ शकत नाही म्हणूनच ही काळजी घेण्यासाठी ‘स्पा आणि वेलनेस’ उद्योग उभा राहिला आहे. शरीर आणि मनाला आनंद मिळवून देणाऱ्या या क्षेत्राबद्दलचे पूर्वग्रह काढून टाकून या करिअरची संधी घ्या, असे आवाहन रेखा चौधरी यांनी केले.
नंदुरबारसारख्या आदिवासी भागात सर्वसाधारण तरुणी, अठराव्या वर्षी विवाहाची आणि एकोणिसाव्या वर्षी मातृत्वाची जबाबदारी घेणारी गृहिणी ते ‘स्पा’ ट्रीटमेंटचे पेटंट घेणारी उद्योजिका हा रेखा चौधरी यांचा प्रवास बुधवारी ‘व्हिवा लाउंज’च्या व्यासपीठावर उलगडला. ‘केसरी’ प्रस्तुत ‘लोकसत्ता व्हिवा लाउंज’ हा कार्यक्रम स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक येथे पार पडला. आजच्या कॉर्पोरेट, चकाचक जीवनशैलीत परिचयाच्या झालेल्या तरीही कायम दुर्लक्षित अशा ‘स्पा आणि वेलनेस’ उद्योगाबद्दलचे सगळे गैरसमज रेखा चौधरी यांनी आपल्या गप्पांमधून दूर केले.
शरीर, मन, आत्मा यांना समाधान मिळवून देण्याचे काम स्पाच्या माध्यमातून केले जाते. तुम्ही स्वत: आनंदी असाल तर दुसऱ्यांना आनंदीत ठेवू शकता आणि हा आनंद तुमच्या शारीरिक-मानसिक स्थितीत दडलेला असतो, असे सहज सोपे विचार मांडत स्पा आणि वेलनेसचे आपल्या आयुष्यातील महत्त्व त्यांनी विषद केले. स्पाची मागणी करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे.
मात्र, या क्षेत्रात कुशल कामगार मिळत नसल्याने या उद्योगासमोरच्या अडचणी जास्त असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. दीड महिन्यापासून ते वर्षभराचा अभ्यासक्रम शिकून तुम्हाला या क्षेत्रात चांगले मानधन मिळवून देणाऱ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत, असे सांगून तरुणांनी या संधीचा जास्तीत जास्त फायदा घेतला पाहिजे, असे आवाहन त्यांनी या निमित्ताने केले.
‘ग्लोबल वेलनेस ब्रँड अॅम्बेसेडर’ या पदापर्यंतचा त्यांचा प्रवास, स्पाच्या संकल्पनेसह या क्षेत्रातील फायदे-अडचणी या सगळ्याबद्दल त्यांनी मारलेल्या गप्पा २५ मार्चच्या शुक्रवारच्या व्हिवा पुरवणीत सविस्तर वाचता येतील.