मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवून पदपथावर झोपलेल्यांना चिरडून एकाच्या मृत्यूस व चौघांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याच्या आरोपाप्रकरणी अभिनेता सलमान खानवर चालविण्यात येणाऱ्या खटल्याचा निकाल ६ मे रोजी सकाळी ठीक ११ वाजून १५ मिनिटांनी सत्र न्यायालय देणार आहे. त्यामुळे १३ वर्षांपूर्वीच्या या खटल्यात न्यायालय सलमानला दोषी ठरवून शिक्षा सुनावणार की त्याची निर्दोष मुक्तता करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सदोष मनुष्यवधाच्या आरोपाअंतर्गत सलमानला न्यायालयाने दोषी धरले तर त्याला १० वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. डब्ल्यू. देशपांडे यांच्यासमोर सलमानवर सदोष मनुष्यवधाच्या नव्या आरोपाअंतर्गत खटला चालविण्यात आला. सोमवारी सरकारी तसेच बचाव पक्षाने आपला अंतिम युक्तिवाद पूर्ण केल्यानंतर मंगळवारी सकाळी न्यायालयाने खटल्याचा निकाल ६ मे रोजी सकाळी ठीक सव्वाअकरा वाजता देणार असल्याचे जाहीर केले. वास्तविक न्यायालयाने खटल्याच्या निकालासाठी ५ मे ही तारीख निश्चित केली होती. मात्र विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी व्यक्तिगत कारणास्तव त्यांना त्या दिवशी सुनावणीला हजर राहणे शक्य होणार नसल्याचे सांगितल्यावर न्यायालयाने ६ मे ही तारीख निकालासाठी निश्चित केली.सलमानविरोधात सरकारी पक्षाने एकूण २७ साक्षीदार तपासले. एका सचिन कदम नावाच्या एका सुरक्षारक्षकाला फितूर झाल्याचे सरकारी पक्षाने जाहीर केले.

सलमानला घटनास्थळी पाहिल्याच्या साक्षीवरून कदम याने घूमजाव केले होते. सलमाननेही आरोपी म्हणून आपला जबाब नोंदवताना ‘त्या’ रात्री आपण नाहीतर आपला चालक अशोक सिंह गाडी चालवत असल्याचा खळबळजनक खुलासा करून खटल्याला नवे वळण दिले. अशोक सिंह यानेही बचाव पक्षाचा साक्षीदार म्हणून अपघात सलमानच्या हातून नव्हे, तर आपल्या हातून तेही गाडीचा टायर फुटल्याने झाल्याचा दावा केला.