सदोष मनुष्यवधाच्या आरोपप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा झालेला अभिनेता सलमान खान याने शिक्षेविरोधात केलेल्या अपिलावरील सुनावणीला गुरुवारी उच्च न्यायालयात सुरुवात झाली. त्या वेळी ‘त्या’ रात्री मी गाडी चालवत नसल्याचा दावा सलमानच्या वतीने करण्यात आला.
दरम्यान, सलमानचा माजी अंगरक्षक आणि खटल्यातील मुख्य साक्षीदार रवींद्र पाटील याच्या आईने एक अर्ज करून सलमानचा जामीन रद्द करण्याची मागणी न्यायालयाकडे केली. सलमानला जोधपूर येथील खटल्यातही दोन वेळा शिक्षा झालेली आहे. त्यामुळे त्याचा जामीन रद्द करण्याची आणि त्याला दहा वर्षांची शिक्षा देण्याची मागणी सुशीलाबाई पाटील यांनी न्यायालयाकडे केली होती; परंतु रवींद्र पाटील हा अपघातातील पीडित नाही. त्यामुळे ही मागणी मान्य करता येणार नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने ती फेटाळून लावली. शिवाय या वेळी सलमानच्या मागणीवरून अपिलावरील सुनावणीच्या वृत्तांकनावरही न्यायालयाने काही बंधने घातली आहेत.
न्यायमूर्ती ए. आर. जोशी यांच्या खंडपीठासमोर सलमानच्या अपिलावरील सुनावणीला सुरुवात झाली व अ‍ॅड्. अमित देसाई यांनी त्याच्या वतीने युक्तिवाद सुरू केला. त्या वेळी सलमान गाडी चालवत नव्हता आणि सत्र न्यायालयाने त्याचा हा दावा चुकीच्या पद्धतीने फेटाळल्याचा युक्तिवाद केला. अपिलावरील सुनावणी ५ ऑगस्ट रोजी होणार आहे.