पूर्वी राजकीय अभिनिवेश दूर ठेवत आम्ही परस्परांशी संवाद साधायचो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उत्तमराव पाटील, प्रमोद महाजन आदी नेत्यांशी उत्तम चर्चा व्हायची. आता मात्र कोणत्याच पक्षातील नव्या पिढीतील नेत्यांमध्ये असा संवाद व सौहार्द दिसत नाही. संवादाचा हा अभाव राज्यहिताच्या दृष्टीने योग्य नाही, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी व्यक्त केली.
राज्यातील काँग्रेससोबतच्या आघाडीची अखेर, राहुल गांधी यांची भूमिका, राष्ट्रवादीची रणनीती, नरेंद्र मोदी यांच्याबरोबरील संबंध आदी विविध विषयांवर ‘लोकसत्ता आयडिया एक्स्चेंज’ कार्यक्रमात मनमोकळेपणाने मते मांडताना पवार यांनी राजकारणातील दोन पिढय़ांमधील फरकाचे नेमके विश्लेषण केले. भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यानेच राष्ट्रवादीने आघाडी तोडली, असे बोलले जात असल्याबाबतच्या प्रश्नावर बोलताना, महायुती तुटेल याचा अंदाज आला नव्हता, असे पवार यांनी सांगितले. पूर्वीच्या काळी सर्वपक्षीय नेत्यांशी संवाद असायचा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना दूरध्वनी करून युतीबाबत विचारले असते. मग त्यांनीही त्यांच्या शैलीत उत्तर दिले असते. आता असा संवाद अजित पवार किंवा आमच्या तरुण मंत्र्यांचा अन्य पक्षातील तरुण किंवा दुसऱ्या पिढीतील नेत्यांशी दिसत नाही. नव्या नेतृत्वाशी माझा तेवढा संबंध नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या वडिलांशी माझे उत्तम संबंध होते. नव्या पिढीतील नेते माझ्याशी बोलताना थोडे कचरत असावेत व ते साहजिकच आहे, असे ते म्हणाले. मात्र, राज्याच्या हितासाठी नव्या पिढीतील नेत्यांनी एकत्र बसले पाहिजे, असे मत पवार यांनी मांडले.
..तर विरोधी बाकांवरही बसू
निकालानंतर भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येणार, अशी चर्चा सुरू झाल्याकडे पवार यांचे लक्ष वेधले असता,   कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी निधर्मवादाची कास सोडणार नाही, असे स्पष्ट करतानाच प्रसंगी विरोधी बाकावर बसू, अशी भूमिका त्यांनी मांडली. राज्यात राष्ट्रवादीला चांगले यश मिळेल, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास तेव्हाचा तेव्हा विचार करू, असेही स्पष्ट केले.

काँग्रेसच्या नव्या नेतृत्वामुळेच आघाडी तुटली
लोकसभा निकालाच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसबरोबर आघाडी राहावी हे मत सोनिया गांधी यांच्याकडे मांडले होते. आघाडी व्हावी ही सोनियांचीही इच्छा होती; पण काँग्रेसमधील नव्या नेतृत्वाच्या मनात काही तरी वेगळे असावे. समविचारी पक्षांना नेस्तनाबूत केल्याशिवाय काँग्रेस वाढणार नाही, असा त्यांचा समज झाला आहे. यातूनच आम्ही दावा केलेल्या मतदारसंघांत उमेदवार जाहीर करून काँग्रेसने आघाडीच्या चर्चेची दारे बंद केली, असे पवार म्हणाले.

* अजित पवारांमध्ये सुधारणा झाली. वृत्तवाहिन्यांवर शांत मुद्रेने मुलाखती देतात बघून आश्चर्य वाटले.
* सोनिया गांधी यांच्या सूचनेवरूनच तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी आपली आपत्कालीन व्यवस्थापन समितीच्या प्रमुखपदी निवड केली होती. आपल्या अहवालावरूनच ‘एनडीआरएफ’ या यंत्रणेची स्थापना झाली.
*१९९९ च्या लोकसभा निवडणुकीतील कराड मतदारसंघातील पराभवामुळेच बहुधा पृथ्वीराज चव्हाण यांचे आपल्याबद्दल काहीसे वेगळे मत असावे. १९९९ ची पुनरावृत्ती आता पुन्हा होणार नाही आणि पृथ्वीराज चव्हाण विधानसभेवर निवडून येतील.
* नव्या पिढीतील नेत्यांचा प्रादेशिक अस्मितेवर भर. राज्याचे हित लक्षात घेतले जात नाही ही दुर्दैवी बाब.
* न्यूयॉर्कमध्ये गुजराती समाज मोठय़ा संख्येने आहे. त्या समाजाचे प्राबल्य लक्षात घेऊनच नरेंद्र मोदी न्यूयॉर्कला थांबले. त्यांच्या ‘मार्केटिंग’ तंत्राचा तो भाग असावा..  
* गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश आदी राज्यांमध्येही सिंचन योजनांचा खर्च वाढला. सिंचनावरून राष्ट्रवादीबद्दल संभ्रम आणि संशय निर्माण करण्याचा काही जणांचा प्रयत्न यशस्वी झाला.
(पवार यांचे संपूर्ण चिंतन, रविवारच्या अंकात)