अग्निशमन दलाच्या दादर येथील केंद्राच्या उद्घाटन समारंभावेळी पुन्हा एकदा पालिकेतील सत्ताधारी शिवसेना व भाजपामधील दरी उघडी पडली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी झालेल्या उद्घाटन समारंभात उपमहापौरांसह भाजपचे सर्व प्रमुख नेते अनुपस्थित राहिले.

मुंबई अग्निशमन दलाच्या दादर येथील नवीन वास्तूतील केंद्राचा लोकार्पण सोहळा बुधवारी आयोजित करण्यात आला.

या सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर उपमहापौर अलका केरकर, भाजपा गटनेते मनोज कोटक तसेच सुधार समिती अध्यक्ष प्रकाश गंगाधरे आणि बेस्ट समितीचे अध्यक्ष मोहन मिठबावकर यांची नावे होती. मात्र भाजपच्या आमदार, खासदार तसेच बडय़ा नेत्यांची नावे निमंत्रण पत्रिकेवरून वगळण्यात आली. पालिकेतील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपच्या नेत्यांकडे निमंत्रण पत्रिकेवर छापण्याच्या नावांविषयी विचारणा करण्यात आली होती. मात्र या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याने नाव छापू नका, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. शिवसेनेसोबतचे संबंध दिवसेंदिवस बिघडत असल्याने भाजप नेत्यांनी अशा कार्यक्रमापासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

याआधी जूनमध्ये रे रोड येथील ब्रिटानिया उदंचन केंद्राच्या उद्घाटनावेळीही भाजपच्या नेत्यांनी कार्यक्रमावर बहिष्कार घातला होता. त्या वेळी राजशिष्टाचाराचा भाग म्हणून उपमहापौर उपस्थित राहिल्या होत्या.

बुधवारी दादर केंद्राच्या उद्घाटना वेळी मात्र उपमहापौर केरकर यांच्यासह भाजपच्या सर्वच नगरसेवक तसेच मोठय़ा नेत्यांनी कार्यक्रमाला जाणे टाळले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या पुण्यातील स्मार्ट सिटी कार्यक्रमा वेळी शिवसेना नेतेही कार्यक्रमापासून चार हात दूर राहिले होते.

दादर केंद्राच्या कार्यक्रमाला शिवसेनेचे सर्व प्रमुख नेत्यांनी उपस्थिती लावली. महापौर स्नेहल आंबेकर, खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर यांच्यासह सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव व इतर नगरसेवक या कार्यक्रमाला आले होते.

अग्निशमन जवानांसाठी व्यायामशाळा

दादर येथील केंद्रावर अग्निशमन दलाच्या जवानांसाठी पहिल्यांदाच व्यायामशाळा सुरू करण्यात आली आहे. त्या जोडीने भायखळा, वडाळा, मानखुर्द, विक्रोळी आणि बोरिवली या केंद्रावरही बुधवारपासून व्यायामशाळा उघडण्यात आल्या.

अग्निशमन दलाचे संग्रहालय बनवाउद्धव ठाकरे

अग्निशमन दलाचा इतिहास मुंबईकरांसह देशातील जनतेला समजण्यासाठी शहरातील मोक्याच्या ठिकाणी संग्रहालय सुरू करा, अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी या वेळी केली. अग्निशमन दलाच्या वाटचालीचा मागोवा घेण्यासोबतच शहीद झालेल्या जवानांचा स्तंभ उभारला जावा, असे ठाकरे म्हणाले.