शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेने मारहाण केल्याचे प्रकरण समोर आले आहे. बसण्याच्या जागेवरून एअर इंडियाचा कर्मचारी आणि खासदार गायकवाड यांच्यात वाद झाला. त्याचदरम्यान चिडलेल्या गायकवाड यांनी त्या कर्मचाऱ्याला चपलेने मारले. खासदार गायकवाड हे पुण्याहून एअर इंडियाच्या विमानाने दिल्लीला जात होते. गायकवाड यांनी आपण बिझनेस क्लासचं तिकिट खरेदी केले होते. पण जेव्हा विमानात गेलो तेव्हा मला इकॉनॉमी क्लासमध्ये बसवण्यात आले. याचा जाब मी त्या कर्मचाऱ्याला विचारला असता. त्याने मला दाद दिली नाही. मला अपशब्द वापरले. त्यामुळे त्याला मारल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

खासदार गायकवाड हे एबीपी माझा या वृत्त वाहिनीशी बोलताना एअर इंडियावर गंभीर आरोपही केले. एअर इंडियाच्या वरिष्ठांचे इतर खासगी कंपन्यांबरोबर मिलीभगत असल्याने ते बिझनेस क्लासची सुविधा पुरवत नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. मी बिझनेस क्लासचे तिकिट काढले होते. मला त्यांनी इकॉनॉमी क्लासमध्ये दिल्लीला आणले. मी याबाबत त्यांच्याकडे विचारणा केली. त्यांनी काहीच उत्तर दिले नाही. दिल्लीत आल्यावर मी तक्रार पुस्तकात याची नोंद केली आणि याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बोलायचे असल्याचे सांगितले. मी तासभर विमानातच बसून होतो. नंतर एक अधिकारी येऊन माझ्याशी अत्यंत उद्धटपणे बोलू लागल्याचे ते म्हणाले.
त्या अधिकाऱ्याला मी शिवसेनेचा खासदार असल्याचे सांगितले. तरीही तो ऐकण्यास तयार नव्हता. मला मोठमोठ्या आवाजात तो बोलत होता. त्याला विनवणी करूनही तो एकण्यास तयार नव्हता. मी पंतप्रधान मोदींशी बोलतो, असे म्हणत तो मला पकडायला आला. त्यावेळी मी त्याला पायातील सँडल काढून मारल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

दरम्यान, समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी आणि एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी खासदार गायकवाड यांच्याविरोधात कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे. ही अत्यंत लज्जास्पद बाब असून एका लोकप्रतिनिधीला न शोभणारे असल्याचे ते म्हणाले. तसेच त्यांची निलंबन करण्याची मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, संबंधित कर्मचाऱ्याने खासदार गायकवाड यांनी आपल्याला शिवीगाळ केली व नंतर विमानातच्या सर्व कर्मचाऱ्यांसमोर मला मारहाण केली. माझा चष्माही त्यांनी तोडल्याचा दावा त्याने केला.