गेले काही दिवस मुंबईतून गायब झालेल्या पावसाने रविवारी जोरदार पुनरागमन केले आणि उन्हाच्या काहिलीतून श्रावणसरींनी मुंबईकरांची सुटका केली. दुपारी पावसाने जोर धरताच मुंबईतील अनेक रस्त्यांवर पाण्याने नाकाबंदी केली आणि वाहतूक विस्कळीत झाली. परिणामी, काही भागांतील वाहतूक अन्य मार्गाने वळवावी लागली.
विलंबाने आलेल्या पावसाने गेल्या काही दिवसांपासून दडी मारल्यामुळे मुंबईकर चिंतित झाले होते. त्यातच उन्हाचे चटके बसू लागल्याने काहिलीने हैराण झालेल्या मुंबईकरांचे चेहरे पावसाच्या पुनरागमनामुळे खुलले. रविवारी सकाळपासूनच मुंबईत ढगाळ वातावरण होते. काही भागात सकाळी पावसाची रिमझिम सुरू झाली आणि दुपारी पावसाने जोर धरला. दरवर्षी नित्यनियमाने जलमय होणाऱ्या भागात पाणी शिरले आणि आसपासच्या वस्त्यांमधील नागरिकांची तारांबळ उडाली. सुट्टीच्या दिवसाचा मुहूर्त साधून कोसळलेल्या पावसामुळे पालिका कर्मचाऱ्यांचीही धावपळ उडाली. सखल भागात साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी सुट्टी असतानाही अनेकांना घटनास्थळी धाव घ्यावी लागली.
पावसाने जोर धरताच हिंदमाता, किंग्ज सर्कल, वडाळा स्थानक, जुहू तारा रोड, मीलन सब-वे, विलेपार्ले, अंधेरी सब-वे, मरोळ मार्केट, गोरेगाव, मालाड, बोरिवली, दहिसर, कुर्ला, चेंबूर, घाटकोपर, भांडुप येथील सखल भाग जलमय झाले. परिणामी, रस्त्यांवरील वाहतूक अन्य मार्गाने वळवावी लागली.  रविवारी सायंकाळी ४ वाजेपर्यंत कुलाबा येथे सरासरी ४५ मि.मी., तर सांताक्रुझ येथे सरासरी ४३.७ मि.मी. पावसाची नोंद झाली. अंधेरी परिसरात दुपारी १ ते २ दरम्यान तब्बल ६५ मि.मी. पावसाची नोंद झाली.  सुट्टीचा दिवस असल्यामुळे काही मुंबईकरांनी घरातच बसणे पसंत केले. दुपारनंतर पावसाचा जोर ओसरत गेला. मात्र अधूनमधून पावसाच्या सरींचे बरसणे सुरू होते. मध्येच विश्रांती घेत पाऊस पडू लागल्याने सखल भागात साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यास मदत झाली. त्यानंतर रस्त्यावरील वाहतूकही हळूहळू पूर्वपदावर आली. मध्येच विश्रांती घेत कोसळणाऱ्या पावसामुळे रेल्वेची सेवा १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत होती.
तरुणाचा बुडून मृत्यू
मालाड येथील दानापानी बीचवर पोहण्यासाठी समुद्रात उतरलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला. चेतन शर्मा (२६) नावाचा हा तरुण आपल्या कुटुंबासोबत मालाडच्या दानापानी बीच येथे फिरायला गेला होता. दरम्यान, समुद्र पाहून पोहण्याची इच्छा झाल्यामुळे तो पाण्यात उतरला आणि लाटांनी आत ओढला गेला.

पावसाचे पुनरागमन
चोवीस तासात मुंबई शहरात ४.२ मिलीमीटर, तर उपनगरात २.६ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. कुलाबा येथे कमाल तापमान ३१.९ अंश सेल्सिअस व किमान तापमान २५ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ येथे कमाल तापमान ३१.८ अंश सेल्सिअस व किमान तापमान २५.८ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले. या दोन ठिकाणी सापेक्ष आद्र्रता अनुक्रमे ९८ टक्के व ८६ टक्के इतकी नोंदवण्यात आली. येत्या चोवीस तासात जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

समुद्रकिनारे गजबजले
श्रावणाचा पहिला दिवस.. तशात रविवारची सुटी.. सकाळपासून हव्याहव्याशा श्रावणसरी कोसळू लागल्या.. हा सारा माहौल जुळून आला आणि मुंबईकरांनी सरी अंगावर घेत चिंब होण्यासाठी समुद्रकिनाऱ्यांची वाट धरली. सायंकाळपर्यंत दक्षिण मुंबईतील गेट वेपासून ते उपनगरात जुहू चौपाटी असे सारे किनारे गजबजून गेले होते.  रविवारच्या पावसामुळे समुद्रकिनाऱ्यावरील कणीसवाले, चहा-कॉफीवाल्यांचीही चंगळ झाली.

तलावांमधील साठय़ात वाढ
मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या क्षेत्रात रविवारी पावसाचा जोर कायम होता.जोपर्यंत तलावांमध्ये समाधानकारक साठा उपलब्ध होत नाही, तोपर्यंत मुंबईत सुरू असलेली २० टक्के पाणीकपात कायम राहणार आहे.
मोडकसागर, तानसा, विहार, तुळशी, अप्पर वैतरणा, भातसा आणि मध्य वैतरणामध्ये एकूण ३,५१,६८५ दशलक्ष लिटर साठा झाला आहे. मोडकसागरमध्ये ८४,७८४ दशलक्ष लिटर, तानसामध्ये ३६,५५३ दशलक्ष लिटर, विहारमध्ये ८,६६३ दशलक्ष लिटर, तुळशीमध्ये ६,७३३ दशलक्ष लिटर, अप्पर वैतरणामध्ये ३४,८८७ दशलक्ष लिटर, भातसामध्ये १,४२,५३५ दशलक्ष लिटर, तर मध्य वैतरणात ३७,५२९ दशलक्ष लिटर इतका साठा आहे. मात्र गेल्या वर्षी या दिवशी सर्व तलावांमध्ये एकूण ११,३२,९४२ दशलक्ष लिटर इतके पाणी होते.