मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्थेत समन्वय आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत असतानाच रेल्वे स्थानक आणि मेट्रो स्थानक यांना एकमेकांशी जोडण्यासाठी अंधेरी येथे नवीन स्कायवॉक बांधण्यात येणार आहे. मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणातर्फे (एमआरव्हीसी) या स्कायवॉकसाठी निविदा मागवण्यात आल्या असून त्याच्या उभारणीसाठी तब्बल सहा कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या स्कायवॉकबरोबरच अंधेरी पूर्वेला उन्नत तिकीट घरही बांधण्यात येणार असल्याचे या निविदेसाठीच्या अर्जातून स्पष्ट होत आहे.
गेल्या वर्षी मुंबईकरांच्या सेवेत आलेल्या वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या ‘मेट्रो-१’ प्रकल्पाने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली. सध्या या मेट्रो सेवेचा वापर दर दिवशी तब्बल २.८० लाख प्रवासी करतात. या २.८० लाख प्रवाशांपैकी तब्बल सव्वादोन लाख प्रवाशांची वाहतूक घाटकोपर-अंधेरी या स्थानकांदरम्यान होते. त्यामुळे घाटकोपर आणि अंधेरी या दोन्ही रेल्वे स्थानकांमधील प्रवासी संख्येतही वाढ झाली आहे. सध्या अंधेरी मेट्रो स्थानक आणि अंधेरी रेल्वे स्थानक यांना जोडणारा एकच स्कायवॉक अस्तित्त्वात आहे. हा स्कायवॉक अंधेरी रेल्वे स्थानकातील मोठय़ा पुलाला जाऊन मिळतो. तर, अंधेरी मेट्रो स्थानकात आझाद नगरच्या बाजूने बाहेर पडल्यास रस्त्यावर उतरून मग अंधेरी रेल्वे स्थानकात जावे लागते. या भागात मेट्रो व रेल्वे स्थानकांना जोडणारा पूल असावा, अशी मागणी करण्यात येत होती. आता एमआरव्हीसीने या ठिकाणी स्कायवॉक उभारण्याचा निर्णय घेतला आहे.