शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहणारा ‘साप्ताहिक लोकप्रभा’चा विशेषांक प्रकाशित झाला असून मुखपृष्ठावर बाळासाहेब ठाकरे यांचे प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत यांनी चितारलेले अखेरचे व्यक्तिचित्र विराजमान आहे. महत्त्वाचे म्हणजे मृत्यूपूर्वी काही दिवस आधी बाळासाहेबांनी मार्मिकच्या मुखपृष्ठाची संकल्पना स्पष्ट करण्यासाठी केलेल्या रेखाटनांचाही अंकात समावेश आहे.
कलावंतांची कदर करणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी भरभरून बोलताना वासुदेव कामत यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे वर्णन ‘कलावंतांचा राजा’ असे केले आहे. वासुदेव कामत बाळासाहेबांच्या आवडत्या कलावंतांपैकी एक. म्हणूनच बाळासाहेबांनी त्यांना मातोश्रीवर पाचारण करून त्यांच्याकडून व्यक्तिचित्रे करून घेतली. त्यात बाबासाहेब पुरंदरे आणि विजयभाई मेहता यांच्या व्यक्तिचित्रांचाही समावेश होता. ही व्यक्तिचित्रे बाळासाहेबांच्याच उपस्थितीत मातोश्रीवर साकारलेली आहेत. कामत यांच्या लेखातून कलावंत बाळासाहेब उलगडत जातात.
शिवसेनेच्या स्थापनेपूर्वीपासून बाळासाहेबांचे वकील म्हणून काम पाहणारे ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड्. अधिक शिरोडकर यांनी इतक्या वर्षांच्या सहवासातून त्यांना जाणवलेले बाळासाहेब माणूस म्हणून कसे हळवे होते आणि एक नेता म्हणून कसे धारदार होते याचे वर्णन त्यांच्या लेखामध्ये केले आहे.
बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर शिवसेनेचे भवितव्य काय असेल याविषयी मनोहर जोशी, सुधीर जोशी, छगन भुजबळ, गोपीनाथ मुंडे, माणिकराव ठाकरे, रामदास आठवले, विनोद तावडे आदींनी केलेले चिंतनही अंकात समाविष्ट आहे. तर मार्मिकचे पहिले संपादक पंढरीनाथ सावंत, विख्यात व्यंगचित्रकार व गेली सहा वर्षे मार्मिकचे मुखपृष्ठ बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली रेखाटणारे प्रभाकर वाईरकर यांच्या लेखांतून वेगळेच बाळासाहेब आपल्या नजरेसमोर उभे राहतात. तर व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांनी युती शासनाच्या कालखंडात बाळासाहेब ठाकरे यांच्यावर काढलेल्या व्यंगचित्रांमुळे अंक समृद्ध झाला आहे.
या शिवाय बाळासाहेब ठाकरे यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलेल्या आठवणी तसेच बाळासाहेबांचे अनेक दुर्मीळ फोटो, त्यांनी रेखाटलेली व्यंगचित्रे, त्यांच्यावर रेखाटली गेलेली व्यंगचित्रं, त्यांच्या निधनानंतर फेसबुकवर त्यांच्या चाहत्यांनी वाहिलेली श्रद्धांजली असा भरगच्च मजकूर या अंकात आहे.
शिवसेनेत निर्विवादपणे बाळासाहेब ठाकरे यांचाच रिमोट कंट्रोल असतानाही जी काही पडझड व्हायची ती झालीच. तेव्हा त्यांच्या मृत्यूनंतर आता शिवसेनेत ‘आवाज कुणाचा?’ असा प्रश्न रमेश जोशी यांनी उपस्थित केला आहे. बाळासाहेबांच्या ठाकरी शैलीमुळे शिवसेनेतर लोकही त्यांचे भाषण ऐकायला आवर्जून जात. या ठाकरी शैलीची ताकद नेमकी कशात होती, याचे विश्लेषण रवि आमले यांनी केले आहे. गिर्यारोहक ऋषिकेष यादव यांना आलेले बाळासाहेब ठाकरे यांचे दोन अनुभव ठाकरे यांच्या खोचक तसेच दिलदार स्वभावाचे दर्शन एकाच वेळी घडवतात. तर पत्रकार निशांत सरवणकर यांना आलेला बाळासाहेब ठाकरे यांच्या पहिल्यावहिल्या मुलाखतीचा अनुभवही मनोज्ञ आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या अनेकविध फोटोंमुळे तसेच वेगवेगळ्या लेखांमुळे, विशेषत: मुखपृष्ठामुळे हा ‘बाळासाहेब ठाकरे आदरांजली विशेषांक’ संग्रही ठेवावा असाच आहे. हा अंक नियमित अंकाप्रमाणे १० रुपयांनाच उपलब्ध आहे.