वाढीव दरात अल्पोपहार दिल्याने निर्णय

मुंबई-पुणे महामार्गावरील फूड मॉल आणि फूड हबमध्ये अल्पोपाहारासाठी अधिक दर आकारण्यात येत असल्याने एसटी महामंडळाने एसटी बसगाडय़ांचे तेथील थांबे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे एसटीच्या बसगाडय़ा या दोन्ही थांब्यांवर थांबविण्यात येणार नाहीत.

अधिकृत खासगी थांब्यांवर एसटीच्या बसगाडय़ा थांबविण्यासाठी काही नियम घालण्यात आले आहेत. नियमानुसार या थांब्यांवरील हॉटेल्समध्ये ३० रुपयांमध्ये चहा-नाश्ता उपलब्ध करणे बंधनकारक आहे. मात्र मुंबई-पुणे महामार्गावरील फूड मॉल आणि फूड हबमध्ये हा नियम पाळण्यात येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. या दोन्ही ठिकाणी अवास्तव दरात अल्पोपाहार उपलब्ध केला जात असल्याच्या सुमारे ५० तक्रारी प्रवाशांनी एसटी महामंडळाकडे केल्या आहेत. या तक्रारींची दखल घेत एसटी महामंडळाने या दोन्ही ठिकाणचे थांबे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. फूड मॉल आणि फूड हबमध्ये एकूण २५० एसटी बसगाडय़ांना थांबा देण्यात आला होता.