स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी आज मुंबईतील ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि समृद्धी महामार्ग आदी महत्त्वाच्या मुद्द्यांवर या दोघांमध्ये चर्चा झाल्याचे कळते.

शेतकरी प्रश्नांवरून भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर काही दिवसांपूर्वी टीका करणारे खासदार राजू शेट्टी यांनी सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री येथे जाऊन भेट घेतली. शेतकरी कर्जमाफी आणि समृद्धी महामार्गाला शेतकऱ्यांचा होणार विरोध आदी महत्त्वाच्या मुद्द्यांवर या दोघांमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई – नागपूर समृद्धी महामार्ग प्रकल्पाच्या प्रकरणात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी स्पष्ट भूमिका ठाकरे यांनी घेतल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादन करण्यास शेतकऱ्यांचा होणारा विरोध आदी मुद्द्यांवर विरोधक प्रचंड आक्रमक झाले आहेत. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलीच पाहिजे, ही मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनातही यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. शेतकरी कर्जमाफी जाहीर करा, तरच अधिवेशनाचे कामकाज सुरु राहील, अशी भूमिका विरोधकांनी घेतली होती. तसेच अर्थसंकल्प मांडताना विरोधकांनी गदारोळ केला होता. यावरून सरकारने विरोधी पक्षांच्या १९ आमदारांना निलंबित केले होते. त्यानंतर अनेक दिवस विरोधकांनी अधिवेशनाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला होता. अखेर सरकारने १९ आमदारांचेही निलंबन मागे घेऊन कामकाजात सहभागी होण्याबाबत विरोधकांना आवाहन केले होते. दुसरीकडे शेतकरी कर्जमाफीसाठी विरोधकांनी राज्यभरात संघर्ष यात्रा काढली होती. यादरम्यान, विरोधकांनी कर्जमाफीची घोषणा न करणाऱ्या सरकारवर टीकेची झोड उठवली होती. शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा तापलेला असतानाच विरोधकांनी समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याच्या मुद्द्यावरूनही सरकारवर टीका केली आहे. प्रकल्पबाधित शेतकरी जमिनी संपादन करण्यास विरोध करत आहेत. नाशिकसह राज्यभरात शेतकऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. शेतकरी कर्जमाफी आणि समृद्धी महामार्ग प्रकरण तापले असतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शेतकरी प्रश्नांवर चर्चा केली आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी भूमिका ठाकरे यांनी घेतली आहे. त्यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शिवसेना कोणती भूमिका घेते, याकडे शेतकऱ्यांसह सर्वांचेच लक्ष लागले आहे.