आता पक्षनेत्यांशीही सल्लामसलत करण्याची भूमिका

शासकीय ध्येयधोरणे ठरविण्यासाठी आता ज्येष्ठ मंत्री आणि पक्षनेत्यांशी सल्लामसलत करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता ठरविले असून ‘मुख्यमंत्री संघ’ (टीम सीएम) स्थापन करण्यात आला आहे.

फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेवर आल्यानंतर अडीच वर्षे पूर्ण झाली. मुख्यमंत्री फडणवीस कोणताही निर्णय घेताना किंवा सरकारची ध्येय धोरणे ठरविताना ज्येष्ठ मंत्री किंवा पक्षातील नेत्यांना फारसे विश्वासात घेत नाहीत किंवा सल्लामसलत करीत नाहीत, अशी तक्रार होती. त्यामुळे आता या संघाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश बापट, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, अ‍ॅड आशिष शेलार, संजय कुटे, डॉ उपेंद्र कोठेकर, श्रीकांत भारतीय आदींचा समावेश असून आणखीही काही जणांचा त्यात समावेश होणार आहे. या संघाच्या कामकाजाला नुकतीच सुरुवात झाली असून शेतकऱ्यांची कर्जमाफी व अर्थसहाय्याच्या मुद्दय़ावर एका बैठकीत चर्चा झाली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आता २०१९ मधील निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली असून त्यादृष्टीने पुढील काळात शासनाची ध्येयधोरणेही ठरविली जातील. मुख्यमंत्री हे पक्षातील नेत्यांची मते ध्येय धोरणे ठरविताना विचारात घेत नाहीत, अशी तक्रार होती. त्यामुळे आता या संघाच्या माध्यमातून सर्वाशी विचारविनिमय करुन निर्णयप्रक्रिया राबविण्यासाठी मुख्यमंत्री पावले टाकणार आहेत.