३१ डिसेंबरच्या रात्री तळीरामांवर मुंबई पोलिसांची कडक नजर असल्याने ‘मद्यपान करून गाडी चालवण्या’बाबत शिक्षा होऊ नये, यासाठी सर्वानीच आधीपासून आपापली ‘सोय’ करून ठेवली आहे. ३१ डिसेंबरच्या रात्रीसाठी तब्बल १० हजार जणांनी टॅक्सी आरक्षित केली असल्याची माहिती समोर आली आहे. ही आकडेवारी मंगळवापर्यंतची असली तरी बुधवारी संध्याकाळपर्यंत हा आकडा १५ ते २० हजारांच्या घरात जाण्याची शक्यता आहे.
मुंबईत लाल-पिवळ्या टॅक्सींसह फ्लिट टॅक्सींची संख्या अंदाजे २० हजारांच्या घरात आहे. यात लाल-पिवळ्या टॅक्सींची संख्या साडेसात हजारांच्या आसपास आहे. मात्र ३१ डिसेंबरला मदिरेच्या विविध रूपांचा आस्वाद घेऊन गरमागरम झालेल्या तळीरामांची पसंती आल्हाददायक अशा वातानुकूलित टॅक्सींना आहे. सध्या फ्लिट टॅक्सींची मुंबईतील संख्या १६ हजारांवर आहे. यापैकी १० हजारांहून अधिक फ्लिट टॅक्सी ३१ डिसेंबरच्या पूर्वसंध्येलाच आरक्षित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
फ्लिट टॅक्सीमध्येही मेरू, टॅब कॅब, इझी कॅब आणि ओला या चार कंपन्यांच्या टॅक्सींना जास्त मागणी आहे. त्याशिवाय सध्या चर्चेत असलेल्या उबेर टॅक्सीलाही नाइलाजास्तव मागणी असल्याचे चित्र आहे. मेरूच्या २०५० गाडय़ांपैकी १२००-१४०० गाडय़ांचे आरक्षण आधीच झाल्याचे समजते. तर टॅब कॅबच्या २८०० गाडय़ांपैकी १५०० गाडय़ा आधीच आरक्षित झाल्या आहेत. ओला कंपनीच्या ४२५० गाडय़ा असून या कंपनीच्याही निम्म्याहून अधिक गाडय़ांना तळीरामांनी पसंती दिली आहे. तर यंदा हॉटेलमालक किंवा बारमालक यांनीही टॅक्सींची सोय केल्याने या मालकांनी आरक्षित केलेल्या टॅक्सींची संख्या १५००-२००० च्या घरात असल्याचे समजते.
या फ्लिट टॅक्सीशिवाय इतर काळ्या-पिवळ्या टॅक्सीही रस्त्यावर असतील. या टॅक्सींचे आगाऊ आरक्षण शक्य नसल्याने नाक्यावर घुटमळणाऱ्या किंवा एखाद्या मयखान्यासमोर उभ्या असलेल्या या टॅक्सीही तळीरामांचे सारथ्य करण्यासाठी तयार असतील.

अन्न व औषध प्रशासनही सज्ज!
हॉटेलांमध्ये होणाऱ्या पाटर्य़ामधील अन्नात किंवा मद्यात कोणतीही भेसळ होऊ नये, यासाठी अन्न व औषध प्रशासन सज्ज राहणार आहे. प्रशासनाचे २०० अन्नसुरक्षा अधिकारी तैनात राहणार आहेत भेसळीचा काही प्रकार असल्याचा संशय आल्यास हे अधिकारी अन्नाचा नमुना तातडीने गोळा करून त्याचे परीक्षण करतील.

रेल्वे स्थानकांवरही अतिरिक्त सुरक्षा!
मुंबईतील उपनगरीय स्थानकांवर कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाचे जवान रात्रभर तैनात राहणार आहेत. मध्य रेल्वेमार्गावर १६०० जवान तैनात असतील. हे जवान दादर, कल्याण, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, सीएसटी, भायखळा अशा महत्त्वाच्या स्थानकांसह इतरही स्थानकांवर सुरक्षा व्यवस्था पाहतील.