मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे दुसऱ्यांदा प्रस्ताव; दादर, परळ, लालबागकरांना दिलासा

सीएसएमटी, दादर आणि एलटीटीतून सुटणाऱ्या लांबपल्ल्याच्या गाडय़ांचा भार पुढील पाच वर्षांनी बराच हलका होणार आहे. लांबपल्ल्याच्या गाडय़ांसाठी परेल स्थानकाजवळच आणखी एक कोचिंग टर्मिनस बांधले जाणार असून त्याचा दुसऱ्यांदा प्रस्ताव मंजुरीसाठी १५ दिवसांपूर्वीच रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला. रेल्वेच्या परेल वर्कशॉपच्या जागेत हे टर्मिनस उभारले जाईल आणि येथून लांबपल्ल्याच्या ट्रेन सोडल्या जातील, अशी माहिती रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली. यामुळे दादर, लालबाग, परळकरांना दिलासा मिळतानाच पश्चिम रेल्वेच्या अन्य स्थानकातून लांबपल्ल्याच्या ट्रेन पकडण्यासाठी येणाऱ्यांची पायपीटही थांबेल.

पनवेल स्थानकाजवळच मध्य रेल्वेकडून लांबपल्ल्याच्या ट्रेन सोडण्यासाठी टर्मिनस उभारले जात आहे. प्रथम दोन प्लॅटफॉर्म आणि गाडय़ा उभ्या करण्यासाठी एक स्टेबलिंग लाइन तयार केली जाईल. येत्या दोन ते तीन वर्षांत त्याचे काम पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे नवी मुंबईतील लोकांची ठाणे, कल्याण किंवा दादर, सीएसएमटीपर्यंत होणारी पायपीट थांबेल. हे काम पूर्ण होताच आणखी दोन प्लॅटफार्म तयार केले जातील. या टर्मिनसबरोबरच परेल वर्कशॉपच्या जागेतही लांबपल्ल्याच्या ट्रेनसाठी टर्मिनस उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. गेल्या वर्षी हा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला. परंतु तांत्रिक मुद्दे उपस्थित करत प्रस्ताव नाकारण्यात आला. आता पुन्हा नव्याने प्रस्ताव बनवून तो रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

प्रस्तावानुसार, लांबपल्ल्याच्या ट्रेनसाठी पाच प्लॅटफॉर्म बनतील. तर त्याच्या जवळच ट्रेन उभ्या करण्यासाठी पाच स्टेबलिंग लाइन उभारण्यात येतील. ट्रेनची  व्यवस्थित पाहणी करून त्यात काही तांत्रिक दुरुस्ती करता यावी यासाठी पाच पिट लाइनही बांधल्या जाणार असल्याचे सांगितले. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर पाच वर्षांत टर्मिनस बनेल. यासाठी २२० कोटी रुपये खर्च येईल.

  • सीएसटीतून ५० ट्रेन, एलटीटीतून २७ ट्रेन, दादरमधून ८ ट्रेन सोडल्या जातात.
  • या ट्रेनच्या १७० फेऱ्या होतात.
  • परेल कोचिंग टर्मिनसमुळे दादर, लालबाग, परळ भागातील स्थानिकांनाही बराच फायदा होईल.