स्वीकृत सदस्याची नियुक्ती करताना पक्षादेशाचे पालन केले नाही म्हणून प्रदेश काँग्रेसने ठाणे शहर अध्यक्ष बाळकृष्ण पूर्णेकर तसेच पालिकेतील गटनेते विक्रांत चव्हाण यांची पदावरून हकालपट्टी केली. यामुळे शहर काँग्रेसमधील गटबाजी उफाळून आली असून, पक्षाच्या निर्णयाच्या विरोधात काही पदाधिकाऱ्यांनी पदाचे राजीनामे दिले आहेत.
ठाणे महापालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे समर्थक आणि शहर काँग्रेसचे पदाधिकारी प्रदीप राव यांच्या नावाची तीन वर्षांपूर्वी शिफारस करण्यात आली होती. पण न्यायालयीन प्रक्रियेमुळे ही नियुक्ती होऊ शकली नव्हती. न्यायालयाने स्थगिती उठविल्याने ही नियुक्ती केली जाणार आहे. राव यांनी तीन वर्षांपूर्वीच आपल्या नावाला पक्षाने मान्यता दिल्याचा मुद्दा मांडीत या पदावर दावा केला. पण पक्षातील काही नेत्यांनी या नावाला विरोध केला होता. पक्षाने कामगार नेते शरद राव यांचे बंधू रवी राव यांच्या नावाची शिफारस केली होती. स्थानिक नेत्यांनी मात्र प्रदीप राव यांचा अर्ज दाखल केला.
रवी राव यांनी स्वीकृत सदस्य म्हणून पाच वर्षे काम केले आहे. तसेच गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत त्यांनी उघडपणे पक्षाच्या विरोधात काम केले होते. त्यांच्याऐवजी अन्य कोणालाही संधी द्यावी, अशी मागणी स्थानिक पातळीवरून करण्यात आली होती. पण त्याकडे दुर्लक्ष करून पक्षाने रवी राव यांच्या नावाची शिफारस केल्याने स्थानिक नेत्यांनी बंडाचे निशाण फडकविले.