विमानतळावर महिलेसह चौघे अटकेत

केंद्रीय सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने (एआययू) शुक्रवारी मध्यरात्री मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशातून चोरटय़ा मार्गाने आलेले तब्बल ५ किलो सोने हस्तगत केले. या सोन्याची किंमत १ कोटी ७७ लाख इतकी आहे. या कारवाईत परदेशी नागरिक, महिलेसह चौघांना एआययू अधिकाऱ्यांनी बेडय़ा ठोकल्या आहेत. यातील एकाने हे सोने अंतर्वस्त्रात दडवून आणले होते. दोन्ही प्रकरणांमध्ये दुबईतील व्यापाऱ्यांनी सोने नेण्यासाठी या प्रवाशांना पैसे दिल्याची बाब उघड झाली.

एआययूने दिलेल्या माहितीनुसार, तुर्कस्तानहून मुंबई विमानतळावर उतरलेल्या गोखार डेमीर या प्रवाशाकडून तब्बल तीन किलो सोने हस्तगत करण्यात आले. डेमीरने परिधान केलेल्या पट्टय़ात एक किलो वजनाची सोन्याची बिस्किटे दडवली होती. हा पट्टा सोन्यासह अन्य वस्तूंच्या तस्करीसाठी बनवून घेण्यात आला असावा, असा दावा एआययू अधिकाऱ्यांनी केला आहे. शारजाहून मुंबईत उतरलेल्या २६ वर्षीय अब्दुल इर्शादने आपल्या अंतर्वस्त्रात दडवून सुमारे एक किलो सोने आणले होते. केरळचा रहिवासी आणि पेशाने मजूर असलेल्या अब्दुलने दुबईतील व्यापारी मोहम्मद सिद्धिकी याच्या सांगण्यावरून हे सोने मुंबईत आणले. या कामासाठी त्याला वीस हजार रुपये मिळाले होते, अशी माहिती चौकशीतून समोर आली.

दुबईहून मुंबईत उतरलेल्या मोहम्मद उर्मी मुग्गू या ५० वर्षीय मजुराने शरीरात दडवून तब्बल अर्धा किलो वजनाचे सोने आणल्याचे झाडाझडतीत स्पष्ट झाले. मुग्गू केरळचा रहिवासी असून त्यालाही हे सोने आणण्यासाठी दुबईमधील अयुब नावाच्या व्यापाऱ्याने पैसे दिले होते. अन्य एका कारवाईत केनिया देशाची नागरिक असलेल्या एका महिलेला एआययू अधिकाऱ्यांनी अटक केली. नयना शेख असे तिचे नाव आहे. तिच्याकडून सुमारे चारशे ग्रॅम वजनाच्या एकूण सात सोन्याच्या बांगडय़ा हस्तगत करण्यात आल्या.

परकीय चलनही हस्तगत

उल्हासनगरमध्ये जमीन-घर खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या हरेश कुकरेजा या तरुणाला एआययूने अटक केली. हरेश दुबईला जाणारे विमान पकडण्याच्या घाईत होता. एआययू अधिकाऱ्यांनी त्याची झाडाझडती घेतली, तेव्हा त्याच्या बुटांमध्ये दडवलेले १४०० डॉलर आणि ९५ हजार सौदीचे रियाल सापडले.