*  विविध राजकीय पक्षांचे झेंडे, टोप्यांसोबत यंदा मोबाइल कव्हर, की-चेनची चलती * लालबागच्या बाजारात कार्यकर्त्यांची गर्दी

एकीकडे साडीच्या काठावरील ‘धनुष्यबाण’, तर दुसऱ्या बाजूला फुललेल्या ‘कमळा’चा काठ; ‘घडय़ाळा’च्या की-चेन आणि ‘हाता’चे फुगे; चार रंगांमध्ये रंगलेले ‘इंजिन’, तर ‘हत्ती’ असलेले मोबाइलचे कव्हर.. राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा झाल्या झाल्या मुंबईच्या लालबाग परिसरातील निवडणुकीच्या प्रचार साहित्याचा बाजार फुलू लागला आहे. राज्यभरात प्रचारासाठी याच बाजारातून साहित्य पुरवले जात असून त्यात पक्षांचे मोठमोठे झेंडे, साडय़ा, मफलर, टोपी या नेहमीच्या साहित्याबरोबरच यंदा शर्टाचे बटण, की-चेन, फुगे, मोबाइल कव्हर, छोटी पाकिटे अशा वस्तूंनाही प्रचंड मागणी आहे. प्रचाराला निघण्यासाठी पांढराशुभ्र कुर्ता आणि त्यावर विविध रंगांची जाकिटे खरेदी करण्यासाठीही अनेक कार्यकर्ते लालबाग भागात धाव घेत आहेत.

मुंबईसह राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर अनेक ठिकाणी उमेदवारांची नावे जाहीर होण्यापूर्वीच सावंतवाडी, मराठवाडा या भागातून पक्षांचे झेंडे आणि प्रचाराचे साहित्य यांची मागणी सुरू झाली आहे. मागणी नोंदवणाऱ्या पक्षांमध्ये प्रामुख्याने शिवसेना आणि भाजप या राज्यात सत्तेवर असलेल्या पक्षांचा समावेश मोठय़ा प्रमाणावर आहे. त्या खालोखाल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनीही या खरेदीत जोर धरला आहे.

पक्ष कोणताही असो, त्या पक्षाच्या झेंडय़ापासून ते अगदी पक्षाचे चिन्ह असलेल्या शर्टाच्या बटणापर्यंत प्रचाराचे सर्व साहित्य लालबागच्या या दुकानांमध्ये  पलब्ध होते. राज्यभरातील सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि काही स्थानिक नेतेही हे साहित्य खरेदी करण्यासाठी मुंबई गाठतात. पक्षाचा झेंडा हा कार्यकर्त्यांच्या अस्मितेचा मानबिंदू असला, तरी यंदा या झेंडय़ाबरोबरच पक्षाचे चिन्ह असलेल्या की-चेन, मोबाइल कव्हर या वस्तुंसाठी तरुणांकडून जास्त मागणी आहे.

सेना-भाजप यांची युती होते की नाही, याकडे राजकारणातील धुरंधरांप्रमाणेच या दुकान मालकांचेही लक्ष लागले आहे. याचे सोपे कारण म्हणजे युती झाली, तर या वस्तुंचा खप दुपटीने वाढणार आहे. या युतीत रिपब्लिकन पक्षाचा समावेश झाला, तर या दुकानदारांसाठी ही निवडणूक पर्वणी ठरू शकेल. एरवी शिवसेनेचा कार्यकर्ता फक्त सेनेच्या प्रचाराचे साहित्य घेऊन जातो. युती झाली, तर शिवसेनेच्या दहा झेंडय़ांबरोबर भाजपचे पाच-सहा झेंडेही विकले जातात, असे पारेख ब्रदर्स दुकानाचे योगेश पारेख यांनी सांगितले.

निवडणूक ‘तुमची’,  प्रचारसाहित्य ‘आमचे’!

निवडणूक राज्याच्या राजधानीतील महापालिकेची असो, वा विदर्भातील एखाद्या शहरातील नगरपालिकेची असो; त्यासाठी लागणारे प्रचारसाहित्य गुजरातमधील अहमदाबादमध्ये प्रामुख्याने तयार होते.

मुंबईतील कामगारांचा खर्च परवडणारा नाही. त्यात गुजरातमध्ये वस्तुंच्या निर्मिती प्रक्रियेचा खर्च कमी असतो. मुंबईत ६० रुपयांमध्ये तयार होणारी वस्तू गुजरातमध्ये १० रुपयांना तयार होते. त्यामुळेच प्रचारासाठी लागणाऱ्या वस्तू प्रामुख्याने गुजरातमधून आणल्या जातात.

निवडणुकीनंतरही उपयोग हवा..

लालबाग येथील लहान मुलांचे कपडे विकणाऱ्या तेंडोलकर आर्ट या दुकानात निवडणुकीच्या महिन्यात फक्त प्रचाराचे साहित्यच विकले जाते. गेली ३० वर्षे असे साहित्य विकणाऱ्या या दुकानाचे मालक विनय तेंडोलकर यांच्या मते यंदा की-चेन, पक्षचिन्हाचे बटण, प्लास्टिकचे पताके, गोल फुगे, मोबाइल कव्हर आणि पक्षचिन्ह असलेले पाऊच यांची मागणी जास्त आहे.

निवडणुकीच्या प्रचारानंतरही ज्या वस्तूंचा वापर होऊ शकतो, अशा वस्तुंचीच मागणी यंदा आहे. त्यातही मतदारांना आकर्षित करतील, अशा वस्तुंकडे कार्यकर्त्यांचा कल आहे, असेही तेंडोलकर यांनी सांगितले. निवडणुकीच्या महिन्यात साधारण ७० ते ७५ लाखांचा माल विकला जातो.

मनसेचे साहित्य जुनेच

यंदा मनसेच्या प्रचार साहित्याला अजिबात मागणी नाही, असे लालबाग येथील विक्रेत्यांनी सांगितले. यावेळेस आम्ही मनसेचे झेंडे किंवा कटआऊट तयार केले नाहीत किंवा इतर राज्यातून आयात केले नाहीत. गेल्या निवडणुकीतील उरलेले साहित्यच विक्रीसाठी काढले आहे. नवीन साहित्य आणून नुकसान करून घेण्यापेक्षा जुना माल विक्रीस काढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.