ठाण्यातील बाळकुम ते मुलुंड यादरम्यान असलेल्या १८०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीची तातडीने दुरुस्ती करावी लागत असल्याने ३ ते ५ फेब्रुवारीदरम्यान संपूर्ण शहरात दहा टक्के पाणीकपात केली जाणार आहे. या कामाव्यतिरिक्त कुर्ला येथील १२०० मिलिमीटर व्यासाच्या वाहिनीचेही काम हाती घेण्यात आल्याने ४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजल्यापासून ते ५ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत कुर्ला पश्चिम भागातील पाणीपुरवठा पूर्ण बंद राहील. मरोशी ते रुपारेलदरम्यानचा जलबोगदा पूर्ण क्षमतेने कार्यरत करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या कामामुळे २८ जानेवारी ते ३० जानेवारीपर्यंत दक्षिण मुंबईत पाणीकपात करण्यात आली होती.
तानसा जलवाहिनीचे काम ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता सुरू होईल. या कामासाठी ५५ तासांचा अवधी लागणार असल्याने ५ फेब्रुवारी, संध्याकाळी ६ वाजेपर्यंत १० टक्के पाणीकपात जाहीर करण्यात आली आहे. पाण्याचा दाब कमी राहिल्याने पाणी वितरणाच्या अखेरच्या भागात, उंचावरील विभागात तसेच थेट पुरवठा होत असलेल्या दक्षिण मुंबईतील इमारतींमध्ये अधिक प्रभाव जाणवेल. कुर्ला जलवाहिनीच्या कामामुळे या विभागातील काजूपाडा, एल. बी. एस. मार्ग, सी. एस. टी. मार्ग, एस. जी. बर्वे मार्ग, ख्रिश्चन व्हिलेज, न्यू मिल रोड, चुनाभट्टी, ब्राह्मणवाडी, तकीया वॉर्ड, सुंदरबाग येथे बुधवार, सकाळी १० पासून ते गुरुवार, संध्याकाळी ६ वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.