पश्चिम व मध्य रेल्वेवरील महत्त्वाच्या स्थानकांचा समावेश

मुंबईच्या उपनगरीय लोकल गाडय़ा वेगाने धावोत वा न धावोत, मुंबईतील उपनगरीय स्थानकांवर आता ‘वाय-फाय’ सेवा मात्र सुसाट धावणार आहे. मुंबई सेंट्रल स्थानकात ४-जी वेग देणारी वाय-फाय सुविधा रेल्वेने गुगलच्या सहाय्याने दिल्यानंतर ही सुविधा येत्या चार महिन्यांत मुंबईतील १५ महत्त्वाच्या स्थानकांवर देण्यात येणार आहे. ही सेवादेखील गुगलच्या माध्यमातूनच देण्यात येईल.

देशभरातील ४०० महत्त्वाच्या स्थानकांवर वाय-फाय सेवा देण्याची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आपल्या रेल्वे अर्थसंकल्पात केली होती. त्यानुसार मुंबई सेंट्रल येथे काही महिन्यांपूर्वी गुगलच्या सहाय्याने रेल्वेच्या ‘रेलटेल’ या नेटवर्कने वाय-फाय सेवा सुरू केली होती. स्थानक परिसरात मोबाइलमध्ये वाय-फाय सुरू केल्यावर आणि या सेवेसाठी क्लिक केल्यावर प्रवाशांच्या मोबाइलमध्ये एक संकेतक्रमांक एसएमएसद्वारे पाठवला जातो. हा संकेतक्रमांक टाकल्यावर ४जी वेग देणारी वाय-फाय सेवा प्रवासी अध्र्या तासासाठी विनामूल्य वापरू शकतात. आता ही सेवा पश्चिम तसेच मध्य रेल्वेवरील सर्व महत्त्वाच्या स्थानकांवर देण्यात येणार असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले. यात पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट, दादर, वांद्रे, अंधेरी, बोरिवली आणि वांद्रे टर्मिनस या स्थानकांचा समावेश आहे. तर मध्य रेल्वेवरील भायखळा, दादर, कुर्ला, ठाणे, कल्याण, वाशी, बेलापूर, पनवेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकांवरही ही सेवा सुरू होईल.

सेवा कुठे?

  • पश्चिम रेल्वेवर..

चर्चगेट, दादर, वांद्रे, अंधेरी, बोरिवली आणि वांद्रे टर्मिनस या स्थानकांचा समावेश आहे.

  • मध्य रेल्वेवर..

भायखळा, दादर, कुर्ला, ठाणे, कल्याण, वाशी, बेलापूर, पनवेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस

  • वाय-फाय सेवेसाठी लागणारी केबल रेलटेल पुरवणार आहे, तर वाय-फाय राउटर आणि उर्वरित सेवा गुगल देणार आहे.
  • या कामासाठी फार बदल करायचे नसल्याने येत्या तीन ते चार महिन्यांत वाय-फाय सेवा या १५ स्थानकांत सुरू होण्याची शक्यता