नवनिर्वाचित पालिका अध्यक्षांचा सत्कार

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून विजयी झालेल्या पालिका अध्यक्षांचा सत्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देशपांडे सभागृहात झालेल्या कार्यक्रमात करण्यात आला. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे कार्यक्रमाला उपस्थित होते. या निवडणुकीत भाजपला मिळालेले यश एका नेत्याचे नसून ‘टीम वर्क’चा हा विजय आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मागील निवडणकीत १८५ पैकी ८० पालिकांमध्ये पक्षाचा एकही नगरसेवक नव्हता. या निवडणुकीत चित्र पालटले. विविध पक्षांची मक्तेदारी मोडीत काढून अनेक ठिकाणी पक्षाला यश मिळाले. कोकणातील विजय जास्त महत्त्वाचा आहे. विदर्भात पक्षाने ताकद दाखवून दिली असून वर्धा जिल्ह्य़ात शतप्रतिशत विजय झाला आहे. चंद्रपूर, वरोऱ्यात नगराध्यक्ष जिंकले. वणीतही यश मिळाले. पश्चिम विदर्भ, पादक्रांत केला. पूर्वी पक्षाचे चिखलीत अस्तित्व नव्हते. तेथे भाजपने झेंडा रोवला. पश्चिम महाराष्ट्रात सातारा, कराडमध्ये पक्षाचे उमेदवार निवडून आले. निवडणुकीत मिळालेल्या यशाने हुरळून जावू नका, प्रशासन गतिमान करा, सामान्य माणसांचे जीवन बदलण्यासाठी प्रयत्न करा. त्यांची  कामे करा, असा सल्ला त्यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्षांना दिला.

कार्यक्रमाला केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, कृषी मंत्री पांडुरंग फुडंकर, शिक्षण मंत्री विनोद तावडे, ग्राम विकास व महिला बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे, महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील, आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा आणि महापौर प्रवीण दटके यावेळी उपस्थित होते.

या निवडणुकीत पक्षाचे भाजपचे ५२ आणि युती केलेल्या पक्षाचे सहा असे एकूण ५८ नगराध्यक्ष आणि १०६ नगरसेवक निवडून आले आहेत. पक्ष राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. सरकारच्या कामगिरीवर निवडणूक झाली होती. त्यात पक्ष उत्तीर्ण झाला आहे, असे दानवे म्हणाले. भाजपवर जातीयवादी पक्ष म्हणून ठपका ठेवला जातो. मात्र, तो खोटा असल्याचे या निवडणुकीने सिद्ध केले आहे. ३४ जागांवर मागासवर्गीय आणि ४५ नगरसेवक मुस्लिम समाजाचे आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.