आजोबांच्या अंत्यविधीनंतर नातवाचा अपघात

आजोबाचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यविधीसाठी आईवडिलांसह आलेल्या नातवाचा अपघात होऊन दुर्दैवी अंत झाला. भरधाव स्कूलबसने नऊ वषार्ंच्या मुलाला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. साहिल रामदेव पाटील रा. कपिलनगर असे मृत मुलाचे नाव आहे.

शुक्रवारी साहिलच्या आईचे वडील रामभाऊ वासुदेव रामटेके रा. मैत्री कॉलनी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. आजोबाच्या अंत्यविधीसाठी साहिल हा आपल्या आईवडिलांसह मैत्री कॉलनीत आलेला होता. कालच त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आले. शनिवारी त्यांच्या अस्थीविसर्जनाचा कार्यक्रम होता. त्यामुळे पाटील कुटुंबीय मैत्री कॉलनीत मुक्कामाला होते. सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास सर्व पाहुणे घराबाहेर बसून होते आणि साहिल हा रस्त्यावर खेळत होता. लोणारा येथील सेंट्रल पॉलिटेक्निक कॉलेजची स्कूलबस त्या ठिकाणाहून जात होती. वाहनचालक रणजितसिंग कमलजित सिंग सैनी (२६) मैत्री कॉलनी याने वेगाने बस चालविली. रस्त्याच्या वळणावर साहिल हा गाडीच्या मागील चाकात सापडला आणि चिरडला गेला. त्यानंतर बसचालक पळून गेला. परंतु गाडीखाली मुलगा आल्याची माहिती बसचालकाला होती. शिवाय बसचालक हा मुलाच्या आजोबाच्या शेजारीच राहात असून त्यानेच साहिलच्या नातेवाईकाला भ्रमणध्वनीकरून अपघाताची माहिती दिली. त्यानंतर रामटेके व पाटील कुटुंबीयांनी त्याला जरीपटका येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. यानंतर जरीपटका पोलिसांना अपघाताची माहिती देण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चक्षुपाल बहादुरे यांच्या मार्गदर्शनात एक पथक अपघाताच्या ठिकाणी पोहोचले आणि गुन्हा दाखल केला. पळून गेलेल्या बसचालकाला मानकापूर परिसरातून ताब्यात घेण्यात आले.

मुलाचे शव बघून आई कोसळली

वडिलांच्या मृत्यूने आधीच दु:खात असलेल्या आईसमोर तिच्या मुलाचा मृत्यू झाला. मुलाचे शव बघून आईची शुद्ध हरपली आणि ती जमिनीवर कोसळली. त्यानंतर साहिलच्या आईलाही डॉक्टरांना दाखवावे लागले. या घटनेमुळे पाटील कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.