कोटय़वधी रुपयांच्या प्रकल्पाचे तीनतेरा

शहरातील पांढराबोडी आणि सोनेगाव तलाव नामशेष होण्याच्या मार्गावर असताना राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाला त्याचे पुनरुज्जीवन करण्याची जाग आली. त्यासाठी कोटय़ावधी रुपयाच्या निधी देण्यात आला. मात्र, कामातल शिथिलतेमुळे पुनरुज्जीवन तर दूरच, पण या तलावांच्या मृतावस्थेचा मार्ग मात्र मोकळा झाला. पांढराबोडी तलावाच्या पुनरुज्जीवन प्रक्रियेतही हीच पुनरावृत्ती घडली आहे. पांढराबोडी तलावात थोडफार नावापुरते पाण्यांचे डबके दिसून येतात, पण सोनेगाव तलाव मात्र एप्रिल महिन्यातच कोरडा पडला आहे. त्यामुळे पुनरुज्जीवनाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पांढराबोडी आणि सोनेगाव तलावांच्या पुनरुज्जीवनासाठी बऱ्याच वर्षांनंतर का होईना राज्याचे पर्यटन खाते जागे झाले. या पुनरुज्जीवन योजनेअंतर्गत पांढराबोडी तलावाकरिता ३.३३ कोटी रुपयांचा प्रकल्प आणि सोनेगाव तलावाकरिता ३.८६ कोटी रुपयांच्या प्रकल्पाची आखणी करण्यात आली.

प्रकल्पाची सुरुवात तलावाच्या खोलीकरणापासून होणार होती. किमान दोन ते चार फुट तलावाचे खोलीकरण केल्यानंतरच इतर कामांना सुरुवात करायची होती. मात्र, प्रकल्पाच्या शुभारंभावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. सोनेगाव तलावाच्या पुनरुज्जीवनाचा कालावधी २०१० ते २०१४ असा होता. गेल्या दोन वर्षांपासून हा तलाव एप्रिल-मे महिन्यातच पूर्णपणे कोरडा पडत आहे. यावर्षी तर मार्चच्या अखेरीस तलावातील पाणी आटण्यास सुरुवात झाली आणि एप्रिल महिन्याच्या अखेपर्यंत तलाव पूर्णपणे कोरडा झाला.

त्यामुळे तलावाच्या पुनरुज्जीवाची सुरुवात ज्या खोलीकरणापासून व्हायला हवी होती, ते खोलीकरणच झाले की नाही यावर शंका आहे. हीच स्थिती पांढराबोडी तलावाची आहे. या तलावाच्या कडेला मातीचा बांध घालण्यात आला असला तरीही येथेही तलावाच्या खोलीकरणावर प्रश्नचिन्ह आहे. पाण्याचे डबके ठिकठिकाणी असून दगड आणि मातीचे उंचवटे आणि अनावश्यक व उपद्रवी वनस्पतींचे आक्रमण झाले आहे. या संपूर्ण कामासंदर्भात नदी आणि तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पाचे विशेष अधिकारी इस्राईल मोहम्मद यांच्याशी सतत दोन दिवस संपर्क केला, पण व्यस्त असल्याचे सांगत त्यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले.

उपद्रवी वनस्पती पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून घातक

तलावांचे अस्तित्त्व नाममात्र उरले आहे. त्यामुळे आहे ते तलाव पुनरुज्जीवीत करुन टिकवून ठेवणे आवश्यक आहे. त्याची सुरुवातच तलावाच्या खोलीकरणापासून व्हायला हवी. गेल्या पावसाळ्यात भरपूर पाऊस होऊनही सोनेगाव तलाव एप्रिल महिन्यात कोरडा होणे आणि पांढराबोडी तलावात अनावश्यक व उपद्रवी वनस्पती वाढणे पर्यावरणाच्या दृष्टीकोनातूनसुद्धा घातक आहे, अशी प्रतिक्रिया पर्यावरण अभ्यासक सुरभी जयस्वाल यांनी व्यक्त केली.

काय होते प्रकल्पात

तलावात साचलेला अनावश्यक गाळ काढून दोन ते चार फूट तलावाचे खोलीकरण करणे. तलावातील अनावश्यक व उपद्रवी वनस्पती नष्ट करणे. तलावाच्या पाणथळ क्षेत्राची धूप  रोखण्यासाठी आणि तलावाची गुणवत्ता टिकवण्याकरिता उपाययेाजना करणे. जैविक प्रक्रियेच्यामाध्यमातून तलावातील पाण्याची गुणवत्ता सुधारणे. तलावातील पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करणे. तलावाच्या किनाऱ्याचे सौंदर्यीकरण करणे आणि कुंपण घालणे. हरित पट्टा विकसित करणे. सोनेगाव तलावातील अतिरिक्त पाणी वाहून जाणारी सहकारनगरातील तसेच विमानतळाकडील नाल्याची यंत्रणा  विकसित करणे, आदी कामे या प्रकल्पात समाविष्ट आहेत.