महापालिका सभेत विरोधकांचा सभात्याग

अतिवृष्टी आणि त्यामुळे लोकांची झालेली गैरसोय व नुकसान यावर चर्चा करण्यासाठी आणलेला स्थगन प्रस्ताव महापौरांनी नाकारल्यामुळे विरोधकांनी या विषयावरून सभागृहात गोंधळ केला. गोंधळातच अन्य विषय मंजूर करण्यात आले. विरोधकांनी स्थगन प्रस्ताव, विषयपत्रिकेची प्रत महापौरांच्या आसनाकडे भिरकावत सभात्याग केला.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर स्थगन प्रस्तावावर चर्चा व्हावी, अशी मागणी काँग्रेसचे सदस्य प्रफुल गुडधे यांनी सभागृहात केली. तीन दिवसांपूर्वी शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली परिस्थिती बघता या विषयावर चर्चा करावी, अशी मागणी त्यांनी केली.

परंतु महापौर नंदा जिचकार यांनी ती फेटाळत प्रांरभी विषयपत्रिकेवरील सर्व विषयावर चर्चा करू व नंतर स्थगन प्रस्तावावर चर्चा करू, अशी सूचना केली. मात्र, विरोधक ऐकायला तयार नव्हते.

अन्य विषयावर चर्चा करण्यापेक्षा अतिवृष्टीवर चर्चा करावी, अशी मागणी केली. प्रस्ताव नाकारल्यावर विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, प्रफुल गुडधे, संदीप सहारे, बसपचे जमाल सिद्दीकी आदी काँग्रेस आणि बसपचे सदस्य महापौरांच्या आसनासमोर आले आणि त्यांनी घोषणा देणे सुरू केले.

गुडधे यांनी स्थगन प्रस्तावाची आणि अजेंडय़ाची प्रत फाडली आणि महापौरांच्या आसनाकडे भिरकावली. हा गोंधळ सुरू असताना महापौरांनी विषयपत्रिकेवरील सर्व विषय पुकारत त्याला मंजुरी दिली.

दरम्यान, काँग्रेसचे सदस्य सभागृहावर बहिष्कार टाकत बाहेर पडले. विषयपत्रिकेवरील अनेक महत्त्वाच्या चर्चा होणे अपेक्षित होते, मात्र गोंधळामुळे त्यावर चर्चा होऊ शकली नाही.

महापौर फोन घेत नाहीत, प्रशासनाचे लक्ष नाही, सांगायचे कुणाला?

दूषित पाणीपुरवठय़ावर नगरसेवक आक्रमक

दूषित पाणीपुरवठय़ाबाबत तक्रार करण्यासाठी महापौरांना फोन केला तर त्या उचलत नाही, प्रशासन दखल घेत नाही आणि सभागृहात विषय मांडला तर ऐकले जात नाही, नागरिक आमच्या घरासमोर मोर्चे घेऊन येतात, त्यामुळे आम्ही सांगावे कोणाला असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला. दूषित पाण्यावर चर्चा होत असतानाप्रशासनाकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत.

पावसाळा सुरू होताच शहरातील विविध भागात दूषित पाणीपुरवठय़ाचे प्रमाण वाढले. शिवाय शहरातील अनेक भागात पाण्याची टंचाई असल्यामुळे ऐन पावसाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. याचे पडसाद गुरुवारच्या महापालिका सभेत उमटले. काँग्रेसचे सदस्य रमेश पुणेकर यांनी सभागृहाच्या निर्दशनास ही बाब आणून दिली. मात्र, यावर प्रशासनाने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे पुणेकर आक्रमक झाले. त्यांनी महापौरांना लक्ष्य करीत ‘तुम्ही फोन घेत नाही, सभागृहात बोलू देत नाही, आम्ही करायचे काय’ असा सवाल केला.

मध्य नागपुरातील अनेक भागात आजही पाण्याची टंचाई आहे. ओसीडब्ल्यूचे अधिकारी येतात, पाहणी करतात. मात्र, कार्यवाही करत नाही. त्यामुळे पाणी समस्या कायम आहे. प्रशासनाने दिलेली माहिती दिशाभूल करणारी आहे, असा आरोपही पुणेकर यांनी केला. पुणेकर यांच्या प्रभागात अधिकाऱ्यांनी दौरा करावा आणि नियमित पाणी कसे मिळेल यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश महापौरांनी दिले.  दूषित पाण्यासंदर्भात २६१५ नागरिकांच्या तक्रारी आहेत.

या संदर्भात प्रशासनाने काय कारवाई केली, किती वस्त्यांमध्ये अधिकारी गेले व पाण्याचे नमुने तपासले, आदी सवाल प्रफुल्ल गुडधे, कमलेश चौधरी, पुरुषोत्तम हजारे, दुनेश्वर पेठे यांच्यासह सत्तापक्षाच्या अनेक सदस्यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केले.

दूषित पाणी येणाऱ्या ग्राहकांचे देयके माफ करणार का? असा प्रश्न गुडधे यांनी उपस्थित केला.  शहरातील विविध भागात दूषित पाणी येत असेल तर आणि काही भागात नियमित पाणीपुरवठा होत असेल तर आयुक्तांसह संबंधित विभाग आणि ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी भेटी देऊन पुढच्या सभेत त्या संदर्भात अहवाल द्यावा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.

महापौरांची हुकूमशाही

अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान यावर चर्चा व्हावी म्हणून सभा सुरू होण्याच्या एक तास आधी स्थगन प्रस्ताव देता येतो. त्यानुसार आज सकाळी ९.३० वाजता महापौर, आयुक्त आणि सचिवांना स्थगन प्रस्तावाची प्रत ई मेलद्वारे पाठविण्यात आली आणि त्यांना दूरध्वनी करून सांगण्यात आले होते. या विषयावर चर्चा झाली असती तर सत्तापक्षाचे पितळ उघडे पडले असते. त्यामुळे त्यांनी नियमाची पायमल्ली करून प्रस्ताव नाकारला. सभागृह सुरू होण्याच्या आधी बैठकीत महापौर आणि सत्तापक्ष नेत्यांशी या विषयावर चर्चा केली होती. महापौर हुकूमशाही पद्धतीने कामकाज रेटण्याचे काम करतात. असेच जर सुरू राहिले तर सभागृहाच्या बाहेर आवाज उठवत राहणार आहे.

प्रफुल गुडधे, वरिष्ठ काँग्रेस नगरसेवक

चर्चेची तयारी, पण विरोधकांचाच गोंधळ

अतिवृष्टीवर चर्चा करण्याची सत्तापक्षाची तयारी होती. मात्र, विषयपत्रिकेवरील सर्व विषयांवर चर्चा करू त्यानंतर या विषयावर चर्चा करू, अशी सूचना महापौरांनी केली. परंतु विरोधक काही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते. विषय गंभीर आहे आणि त्यावर चर्चा झाली पाहिजे. त्यासाठी आम्ही तयार होतो. मात्र, महापौरांच्या आसनासमोर जाऊन गोंधळ घालणे, कागद भिरकावणे हे विरोधी पक्षाला शोभणारे नाही. सभागृहाची वेळ सकाळी ११ वाजताची होती. स्थगन प्रस्तावाची प्रत ११ वाजून २५ मिनिटांनी मिळाली. किमान एक तास आधी स्थगन प्रस्ताव द्यावा लागतो. त्यामुळे हा विषय नाकारण्यात आला.

संदीप जोशी, सत्तापक्ष नेता, भाजप