संजय गांधी निराधार योजनेंतर्गत पूर्व नागपुरातील प्रलंबित प्रकरणांकरता नागपूर जिल्हा काँग्रेस समितीने तहसीलदारांना निवेदन सादर केले. समितीचे सरचिटणीस व प्रवक्ते अ‍ॅड. अभिजित वंजारी यांच्या नेतृत्वाखाली पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघातील डिप्टी सिग्नल, मिनीमातानगर, गोपालनगर व अन्य प्रभागातील लोकांना संजय गांधी निराधार योजनेंतर्गत अनेक वर्षांपासून अनुदान प्राप्त न झाल्यामुळे प्रलंबित प्रकरणे निकालात काढण्याकरता संजय गांधी निराधार योजनेचे कार्यपालन अधिकारी आणि तहसीलदार रवींद्र माने यांना निवेदन सादर केले.
भाजप शासनात संजय गांधी निराधार योजना शासकीय व अशासकीय संस्था सर्वसामान्य जनतेशी भेदभाव करीत आहे. भाजपव्यतिरिक्त इतर पक्षांच्या विचारधारेच्या लोकांची प्रकरणे प्रलंबित ठेवली जातात, त्यामुळे लोकांना योजनेचा लाभ मिळत नसल्याचा आरोप वंजारी यांनी केला. यासोबतच पूर्व नागपुरातील शेकडो प्रकरणे ज्यात जनतेला टोकन प्राप्त झाले आहे, तसेच समितीच्यावतीने काही प्रमाणात शिफारस केली असतानाही त्यांना अनुदान प्राप्त झाले नाही, तसेच काही प्रकरणांमध्ये लोकांची अपिल नोंदवली जात आहेत, अशीही तक्रार वंजारी यांनी यावेळी केली. माने यांनी १२०० पेक्षा जास्त प्रकरणे पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित आहेत. २००४-०५ या वर्षांपासून तर २०१६ पर्यंत अनेक वर्षांपासून जनतेच्या योजनेंतर्गत सर्व प्रकरणे १५ दिवसात निकालात काढण्याचे आश्वासन तहसीलदारांनी दिले. समितीचे सचिव परमेश्वर राऊत, शेख मुजीब वारसी, नागपूर शहर युवक काँग्रेसचे सरचिटणीस अंगद हिरोंदे, झिरिय तेली समाजाचे अध्यक्ष गणेश शाहू, प्रभाग अध्यक्ष राजेश पौनिकर आणि मनोज नौकरकर आदी यावेळी उपस्थित होते.