’  पालक व शिक्षकांच्या प्रतिक्रिया

’ विद्यार्थिनींना अमानुष मारहाण प्रकरण

शाळा-महाविद्यालयांमध्ये ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ या प्रकारामुळे मुलांना चुकण्याची मुभाच राहिली नाही. ‘रिअ‍ॅलिटी शो’च्या नावाने  झगमगीत हवे असते. त्याची घाई पालक, शिक्षक शासन सर्वाना झाली असल्याने पूर्ण समाजच त्यात दोषी असल्याच्या प्रतिक्रिया पालक आणि काही शिक्षकांनी ‘लोकसत्ता’कडे व्यक्त केल्या आहेत. नृत्य शिकवण्याच्या नावाखाली अल्पवयीन विद्यार्थिनींना लोखंडी दांडय़ाने अमानुष मारहाणीचा प्रकार उशिरा उघडकीस आल्याची खंतही पालकांनी व्यक्त केली. समाजात अशा घटना टाळण्यासाठी मुलांना सर्वच गोष्टी ताबडतोब आल्या पाहिजेत, हा आग्रह टाळला जावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

सेतू या पालक संघटनेच्या समन्वयक स्नेहा दामले म्हणाल्या, हल्ली सर्वजण धावत पळत असतात. सगळ्यांना शिकण्याची, कामगिरी करण्याची घाई झाली आहे. त्याचा दबाव कुठेतरी शिक्षकांवरही आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांची शिकण्याची, समजण्याची गती वेगळी असते. पण विद्यार्थ्यांच्या मानसशास्त्राचा विचार न करता त्यांच्याकरवी काहीतरी दाखवून घ्यायची घाई शाळा, शिक्षक, पालकांनाही झाली आहे. खासगी शाळांमध्ये ‘वेशभूषे’साठी जसा करार केला जातो, तसाच ‘इव्हेंट मॅनेजमेंट’साठीही करार केला जातो. अशी मंडळी व्यावसायिक असतात. मुलांशी ते भावनिकदृष्टय़ा जोडले जात नाही. त्यांना केवळ करून दाखवायचे असते. स्नेहसंमेलने हा मुलांना काहीतरी नवीन शिकण्याचा, ते करताना मुले चुकतील, काही गमतीजमती होतील हा प्रकारच आता मागे पडला असून मुलांना १०० टक्के आलेच पाहिजे, असा आग्रह धरला जातो. त्यासाठी मुलांशी बांधीलकी नसलेल्या व्यावसायिकांकडून नृत्य शिकवून घेतले जाते. त्यांना केवळ करवून घ्यायचे असते. भावनिक दृष्टय़ा ते मुलांशी एकरूप नसल्याने असे प्रकार घडतात.

पवन पब्लिक स्कूलच्या वंृदन बावनकर म्हणाल्या, दूरचित्रवाहिन्यांवरील ‘रिअ‍ॅलिटिज शोज’मुळे वेगवेगळ्या नृत्याचे वेड वाढले आहे. शाळांमार्फत त्याचे केवळ अनुकरण केले जाते. तसे शिकवणाऱ्यांना भाडे तत्त्वावर ठेवून घेतले जाते. मुळात मुलांचे स्नायू बळकट नसतात. एखादी मुलगी चांगले करते तेव्हा पालकही त्यांच्या मुलीला अनुकरण करायला लावतात किंवा नृत्याचे वर्ग लावून देतात. प्रत्येक मुलाचा रस वेगळा असतो. बरेचदा मुलांना अनुवांशिकतेतून येत असते. काही मुलांमध्ये उपजत कला असते. काही मुलांना नवीन शिकायला आवडते त्यामुळेही ते शिकतात. काहींना अगदीच आवडत नाही तर केवळ त्यांना त्यांच्या वर्तुळामध्ये राहायला आवडते, काहींना न्यूनगंड असतो. अभ्यासाची सक्ती मुलांवर केलीच आहे. बाकीच्या गोष्टीही शाळेत व्हायला हव्यात पण त्याची सक्ती नको तर समान संधी दिली जावी. शाळांमध्ये केली जातात तेव्हा त्यांचा इतिहासही माहिती व्हायला हवे. आता केवळ मारलय पण त्यापेक्षा मोठे आणि वाईट प्रकार होण्याची शक्यता जास्त असते. नवीन मुलांवर पूणपणे मुले सोपवून द्यायची, हे अजिबातच व्हायला नको. असे करणाऱ्यावर कठोर दंडात्मक कारवाई व्हायला हवी.

संबंधित प्रकरण

नृत्य शिकवण्याच्या नावाखाली सर्वश्रीनगरातील सुयश कॉन्व्हेंटच्या अल्पवयीन विद्यार्थिनींना नृत्य दिग्दर्शकाने लोखंडी दांडय़ाने अमानुष मारहाण केली. मुली रडायला लागल्याने इतर शिक्षक वर्गाच्या दिशेने धावले तेव्हा ही बाब उघडकीस आली. डिसेंबरमध्ये होणाऱ्या स्नेहसंमेलनासाठी राजस्थानी नृत्याचा वर्ग संबंधित नृत्य दिग्दर्शक घेत होता. नृत्य शिकताना होणाऱ्या त्रासाची माहिती विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक अनुराग पांडे यांना दिली होती. मात्र, त्यांनी कानाडोळा केला. मुलींच्या पायावर वळ उठेपर्यंत मारहाण केल्याने पालकांनी रोष व्यक्त केला आहे. याप्रकरणी पोलीस कारवाई सुरू आहे.