पदपथांची दुरवस्था  भाग २

पदपथ हे ‘स्ट्रीट फर्निचर’चा एक हिस्सा असल्याचे सांगितले जात असले तरीही प्रत्यक्षात पदपथांची काळजी त्या पद्धतीने घेतलेली नाही. रस्त्यांवर वाहनांची संख्या वाढत गेली आणि रस्ते रुंद होत असताना पदपथांची रुंदी कमी होत गेली. ९० टक्के पदपथांची अवस्था गंभीर तर उर्वरित दहा टक्के पदपथ अतिक्रमणाने ग्रासले आहेत. या ठिकाणी फेरीवाल्यांपेक्षाही सरकारी अतिक्रमण अधिक आहे.

पदपथ पादचाऱ्यांसाठी खुले ठेवणे ही जबाबदारी महापालिकांची आहे. प्रत्यक्षात रस्त्यांची आखणी आणि निर्मिती करताना वाहनांच्या सुरळीत वाहतुकीला प्राधान्यक्रम दिला जातो. रस्त्याची भौमितिक रचना, वाहतूक दिव्यांची व्यवस्था, विभाजकाचे स्थान, वळणाच्या जागा याचाच विचार केला जातो. रस्ते नियोजनात पदपथदेखील महत्त्वाचे असताना केवळ वाहनांच्या वाहतुकीवर लक्ष केंद्रीत करून पदपथांना दुय्यम स्थान दिले जाते. पादचाऱ्यांच्या पदपथांसाठी जुजबी तरतूद करून त्याला दुय्यम स्थान देण्यात आले आहे.

पदपथ अतिक्रमणात अडकल्याने पादचाऱ्यांना धोका पत्करून रस्त्यावरुन चालावे लागत आहे. ओबडधोबड पदपथांमुळे नागरिक रस्त्यांवरून चालण्याला प्राधान्य देतात आणि अपघाताचा धोका संभवतो. अशावेळी पादचाऱ्यांवर गैरशिस्तीचा आरोप लावण्यात येत असला तरीही मुळात पदपथ त्यांना चालण्यासारखे आहेत का याकडे पाहिले जात नाही. शहरातील पदपथांची अवस्था म्हणजे ओटय़ांसारखी आहे. तुकडय़ातुकडय़ांमध्ये पदपथ विभागल्याने याठिकाणी सर्वात पहिले चहाची टपरीवाले, फेरीवाले आणि भाजीवाल्यांचे अतिक्रमण झाले आहे. पदपथांची काही जागा झाडांनी व्यापलेली आहे.

काही ठिकाणी विजेचे तर काही ठिकाणी जाहिरातीचे खांब पदपथांवरच उभारण्यात आले आहेत. याशिवाय ट्रान्सफार्मर, दूरध्वनीचे डबे, टपाल डबे, बस थांबे ही शासकीय अतिक्रमणे पदपथांवर आहेत. मूळातच आधी पदपथ नीट नाहीत आणि उर्वरित पदपथांवरील अतिक्रमणे हटवण्याकडे महापालिकेचे कमालीचे दुर्लक्ष आहे. आम्ही कारवाई करतो, पण अतिक्रमणे पुन्हा होतात, असा दुबळा बचाव महापालिका अधिकाऱ्यांकडून केला जातो.

शहरी रस्ते मार्गदर्शक तत्त्वानुसार

पदपथाच्या सुरुवातीला आणि शेवटी उतार असावा, जेणेकरून चाकाच्या खुर्चीवरुन जाणाऱ्या दिव्यांगासाठी ते सोयीचे राहील.

घर किंवा प्रतिष्ठानाच्या प्रवेशद्वारासमोरील पदपथाची पातळी न बदलता आवश्यकता असेल तरच उतार द्यावा.

या उतारामुळे पादचाऱ्याची सुरक्षितता धोक्यात येऊ नये अथवा अडथळा निर्माण होऊ नये.

उंची कमी असणाऱ्या ठिकाणी ‘कर्ब रॅम्प्स’ची आणि दृष्टीहिन व्यक्तींसाठी ‘गायडिंग ब्लॉक्स’ची व्यवस्था असावी.

पदपथावरील उखडलेल्या टाईल्स लगेच बदलवाव्यात आणि खड्डे बुजवून समपातळी राखावी.

पदपथांवर लावलेल्या दुचाकींवर सातत्त्याने कारवाई व्हावी.

अतिक्रमण, वाहनतळ, सेवासंबंधित अडथळयांपासून ते मुक्त असावेत.