महापालिकेतील सत्ता प्राप्त करण्यासाठी पक्षातून बाहेर गेलेले, गेल्या निवडणुकीत विरोधात लढलेले आणि विरोधात प्रचार करणारे तसेच मागील निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलेल्यांना पक्षात नि:संकोच स्वागत करण्याचे धोरण शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी स्वीकारले आहे. शहर काँग्रेस कार्यकारिणीत देखील सर्व गटांचा समावेश करताना केवळ ‘सक्षम’ हे निकष लावल्याने काँग्रेसमधील विरोधी गट दुखावला गेला आहे. पक्षविरोधी काम करणाऱ्यांना पुरस्कृत करण्यात येत असल्याची भावना विरोधी गटांची असून महापालिकेच्या आगामी निवडणुकीत परस्परांच्या उमेदवारांना पाडापाडीचे राजकारण बळवण्याची शक्यता आहे.
शहर काँग्रेस कार्यकारिणीला उघड विरोध उत्तर नागपुरात झाला आहे. माजीमंत्री सतीश चतुर्वेदी यांच्या गटातही अस्वस्थता आहे. अन्य चार मतदारसंघातही थोडय़ाफार प्रमाणात असेच चित्र आहे, परंतु तेथे उघड विरोध झालेला नाही. शहर कार्यकारिणीत त्या-त्या मतदारसंघातील मागील विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांनी सुचवलेली सर्व नावे समाविष्ट करण्यात आली. यामुळे संबंधित नेत्याला नावे कापण्यात आल्याची तक्रार करण्याची संधी नाही. मात्र, या नावासोबत या नेत्यांच्या गटात नसलेल्यांना देखील संधी देण्यात आली आहे. मतदारसंघातील कार्यकारिणीवर संपूर्ण वर्चस्व ठेवण्याची मनीषा असलेल्या नेत्यांना ही बाब खटकली आहे. पक्षविरोधी काम करणाऱ्यांना अशाप्रकारे कार्यकारिणीत स्थान दिल्याने हे नेते नाराज आहेत.
मात्र, उघड नाराजी केवळ उत्तर नागपुरातून व्यक्त करण्यात आली आहे. निवडणूक जिंकण्यासाठी पक्षाला मानणारे पण काही कारणास्तव बाहेर गेलेल्यांना पक्षात आणण्याची त्यांची जबाबदारी असल्याचे ठाकरे सांगतात. त्यांच्या विरोधात लढणाऱ्यांना देखील कार्यकारिणीत घेण्यात आले आहे. महापालिकेच्या मागील निवडणुकीत दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाची मते घेणाऱ्यांना पक्षात घेण्यात येत आहे. याशिवाय विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार करणाऱ्यांनाचाही कार्यकारिणीत समावेश आहे. यामुळे संबंधित मतदारसंघातील नेत्यांची कार्यकारिणीवरील एकहाती सद्दी संपली आहे. त्या-त्या मतदारसंघात दोन गट पडलेले आहेत. यामुळे महापालिका निवडणुकीत एकमेकांविरुद्ध काम केल्यास पक्षाचे नुकसान होणार आहे. कार्यकारिणी सर्वसमावेशक असल्याचा दावा करण्यात येत असला आणि जनतेचे पाठबळ असलेल्या कार्यकर्त्यांना कार्यकारिणीत स्थान देण्यात येत असल्याचा दावा असला तरी यामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्याचे ठाकरे यांना कसब दाखवावे लागणार आहे. लोकसभा आणि विधानसभेत पानिपत झाल्यानंतर स्थानिक नेत्यांनी एकजूट दाखवण्याचा प्रयत्न केला होता. कार्यकारिणी जाहीर होताच या नेत्यांमधील मतभेद जगजाहीर झाले आहेत.
काँग्रेस स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा राज्यात आणि केंद्रात सत्तेत नाही. नागपूर महापालिकेत सलग दोनदा पराभव झाला. अशा परिस्थितीत हे नेते महापालिकेत पुनरागमन करण्यासाठी राजकीय अनुभव कामी लावणार की हात दाखवून अवलक्षण करणार, यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे.

प्रभाग अध्यक्षांना विलंब
शहर कार्यकारिणीवरून वाद निर्माण झाल्याने प्रभाग आणि वॉर्ड अध्यक्षांची घोषणा होण्यास विलंब होत आहे. गट अध्यक्षांना प्रभाग अध्यक्ष व वॉर्ड अध्यक्षांची नावे जाहीर करावयाची आहेत. हे अध्यक्ष जाहीर झाल्यानंतर निवडणूक प्रचाराच्या रणनीतीवर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.