गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचा प्रश्न, दोन्ही बाजूने देवाणघेवाण आवश्यक
भारतामध्ये कुठेही असहिष्णुता नाही. सरकार संवेनशील असून जबाबदारीने निर्णय घेत आहे. गझल गायक गुलाम अली यांना आपल्याकडे कार्यक्रम करू देण्यास विरोध केला तर त्यावर भारतामध्ये आगडोंब उसळला. पाकिस्तानी कलावंतांनी कला सादर करण्यास आमची काही हरकत नाही, मात्र त्याचवेळी भारतातील कलावंत पाकिस्तानमध्ये जाऊन कार्यक्रम करूशकतात का? असा प्रश्न उपस्थित करून सांस्कृतिक पातळीवर दोन्ही बाजूने देवाणघेवाण होणे आवश्यक असल्याचे मत ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांनी व्यक्त केले.
अनुभूती संगीत महोत्सवाच्या निमित्ताने डॉ. प्रभा अत्रे नागपुरात आल्या असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भारतामध्ये असहिष्णुतेच्या मुद्दय़ावरून पुरस्कार परत केले जात आहेत. पुरस्कार परत करणाऱ्यांनी देशाच्या समृद्धी आणि विकासासाठी आपले योगदान काय, याचा विचार केला पाहिजे. सरकार संवेदनशील असून, जबाबदारीने निर्णय घेत आहे. त्यामुळे केवळ असहिष्णुतेच्या नावावर पुरस्कार परत करणे पटत नाही. समाजाने दिलेला पुरस्कार आणि आणि आपण समाजाचे एक घटक आहोत, ही भावना त्यांच्यामध्ये असली पाहिजे. गुलाम अली यांच्या कार्यक्रमाला मुंबईमध्ये विरोध केला असताना त्यावर गहजब माजवला गेला. आपल्याकडील किती कलावंतांना पाकिस्तानामध्ये कार्यक्रम करण्याची संधी मिळत असते याचा विचार केला पाहिजे. देवाणघेवाण करायची असेल तर त्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न झाले पाहिजेत.
शास्त्रीय संगीताला ज्या पद्धतीने आकाशवाणी, दूरदर्शन आणि विविध वाहिन्यांवर वाव मिळायला पाहिजे तो मिळत नाही. पूर्वी शास्त्रीय संगीतासाठी स्वतंत्र वेळ दिली जात असे. आकाशवाणीवर शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम कमी झाले आहेत. चित्रपट आणि इतर पाश्चात्य संगीताचा बोलबाला जास्त वाढला आहे. नव्या पिढीच्या कानावर सतत तेच संगीत पडत असल्यामुळे शास्त्रीय संगीताकडे ही पिढी फारशी वळत नसल्याचे समोर आले आहे. यासाठी शाळा-महाविद्यालयांतून शास्त्रीय संगीताचे शिक्षण देण्याची गरज आहे. शालेय पातळीवर विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम ऐकिविले पाहिजेत, तरच विद्यार्थ्यांना यामध्ये आवड निर्माण होईल.
कटय़ार काळजात घुसली या चित्रपटामुळे शास्त्रीय संगीत नव्या पिढीपर्यंत पोहोचले असले तरी केवळ एका चित्रपटामुळे हे शक्य नाही. यात सातत्य राहिले पाहिजे. पूर्वी हिंदी चित्रपटांमधून शास्त्रीय गायन ऐकायला मिळत होते. मात्र, आज ते दुरापास्त झाले आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली

घराण्यांच्या गायकीचे मिश्रण गैर नाही
शास्त्रीय संगीतासाठी जाणकार श्रोते तयार करण्यासाठी आपल्याकडे व्यवस्था नाही. गुरू-शिष्य परंपरेमध्ये आज बदल झाला आहे. तो होणे अपेक्षित आहे. पूर्वी गुरूंच्या घरी राहून शिष्य संगीताची आराधना करीत असे. मात्र, आज शक्य नाही. आधुनिक तंत्रज्ञान विकसित होत असताना त्याचा उपयोग आज केला जात आहे. विदेशात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार चांगला होत असताना तेथे अनेक कलावंत तयार होऊ लागले आहेत. एखाद्या घराण्याची विशिष्ट गायकी असली की त्या घराण्याच्या नावाने कलावंताची ओळख निर्माण होते. आज मात्र गायक कलावंत वेगवेगळ्या घराण्यांचे मिश्रण करून गायन सादर करीत असले तरी त्यात वावगे काही नाही. वेगवेगळ्या घराण्यांची गायकी एकाच कलावंताकडून ऐकायला मिळते, असेही अत्रे यांनी सांगितले.