गेल्यावर्षीपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशामध्ये बदल झाल्यानंतर विजयादशमी उत्सवात सहभागी होणाऱ्या स्वयंसेवकांची संख्या वाढेल, अशी अपेक्षा असताना गेल्यावर्षीच्या तुलनेत यावेळी ही संख्या कमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. एकीकडे देशभरात संघ शाखा आणि त्यात तरुणांची संख्या वाढत असल्याचा दावा संघ पदाधिकाऱ्यांनी केला. मात्र, ही वाढलेली संख्या विजयादशमी उत्सवात का दिसत नाही, याबाबत संघ वतुर्ळात चर्चा सुरू झाली आहे.

राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता येऊन तीन वर्षांचा कार्यकाळ झाला असल्यामुळे संघाकडे तरुणांचा ओढा वाढेल, असा राजकीय विश्लेषकांचा कल होता. मात्र, सत्तेत असलेल्या सरकारचा आणि संघातील स्वयंसेवकांच्या वाढीचा कुठलाही संबंध नसल्याचे सांगत संघाचे प्रांत कार्यवाह दीपक तामशेट्टीवार यांनी संघ शाखांमध्ये तरुणांची संख्या वाढल्याचा दावा पत्रकार परिषदेत केला होता.

दोन वर्षांपूर्वी संघाने त्यांच्या खाकी हाफ पॅन्ट आणि पांढरा शर्ट या गणवेशात बदल करून हाफ पॅन्ट ऐवजी फूल पॅन्ट केला. त्यामुळे गेल्यावर्षी विजयादशमी उत्सवात सहभागी होणाऱ्या स्वयंसेवकांच्या संख्येत वाढ झाली होती. हीच परंपरा यंदाही कायम असेल असे वाटत होते. यावेळी साडेतीन हजार स्वयंसेवक गणवेशात उपस्थित होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. संघाच्या कार्यक्रमांना उपस्थितीचा विचार केला तर ती मोठय़ा प्रमाणात होती. मात्र, गणवेशातील स्वयंसेवकांची संख्या कमी होती. यावर संघाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

संघ परिवारातील संस्थांना विजयादशमी उत्सवाला उपस्थित राहण्याचे आदेश असतात. त्याचे पालनही केले जाते. मात्र, यावेळी नियमित जाणाऱ्या स्वयंसेवकाचा अपवाद वगळता जे आम्ही संघाचे आहो, असे सांगत असतात. ते विजयादशमी उत्सवाकडे फिरकत नसल्याचे दिसून आले. गेल्या वर्षभरात देशभरात संघ शाखामध्ये १७०० ने वाढ झाली आहे. मंडळ पातळीवर शाखा सुरू करण्यात आल्या असून त्यातही १८१ ने वाढ झाली, असा दावा संघ सूत्रांकडून करण्यात आला आहे. मात्र, ही वाढ दसऱ्याच्या कार्यक्रमात का प्रतिबिंबित होत नाही, असा सवाल केला जात आहे.

देशभरात ५२ हजार १०२ शाखा असून गेल्यावर्षीच्या तुलनेत त्यात १६७० ने वाढ झाली आहे. त्यात ८० टक्के तरुण स्वयंसेवकांचा समावेश आहे. मंडळ शाखांची संख्या ८ हजार १२१ होती, त्यात १८१ ने वाढ झाली आहे. विद्यार्थ्यांची संख्या २६ हजार ६७६, केवळ महाविद्यालयीन तरुण ७०२८, व्यवसायी तरुण १३ हजार ६१३ आणि प्रौढ ४ हजार ७८५ आहेत. संघाच्यावतीने विविध सेवा कार्य सुरू आहेत. त्यात शहरात २ हजार ३७५ तर ग्रामीण भागात २५ हजार १०, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संघटना २० हजार ८४१ आणि स्वावलंबन १४ हजार ४३१ संघटना आहेत, हे विशेष.