सीताराम येचुरी यांची टीका

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा छुपा अजेंडा राबवून केंद्रातील मोदी सरकार देशाच्या धर्मनिरपेक्ष चौकटीलाच छेद देण्याचा प्रयत्न करीत असून हे बाब देशासाठी अहितकारक आहे. उत्तर प्रदेशातील दादरी येथील घटनेने ही बाब स्पष्ट झाली आहे, अशी टीका मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सीताराम येचुरी यांनी येथे केली. येचुरी एका कार्यक्रमासाठी येथे आले असताना त्यांनी पक्ष कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला.
केंद्रात भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यास रा.स्व. संघाच्या अजेंडा राबविला जाईल, अशी भीती होतीच. मोदी सरकारच्या दीड वर्षांची कारकीर्द पाहिली. तर ही शंका खरी ठरल्याचे दिसते. मोदींनी निवडणुकीच्या काळात दिलेले एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. उलट, रा.स्व.संघाचा अजेंडा राबविण्याच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू आहे. दोन धर्मात तेढ निर्माण करून राजकीय स्वार्थापोटी मतांचे राजकारण केले जात आहे. उत्तर प्रदेशातील दादरी येथे मांस खाण्यावरून झालेला वाद हा त्याचेच प्रतीक आहे. बिहारमध्ये विधानसभा निवडणुका असल्याने येथेही जातीय धुव्रीकरण करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. विविध केंद्रीय शैक्षणिक संस्थांवर, विद्यापीठांच्या कुलगुरूपदी संघाशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती केली जात आहे. देशाची धर्मनिरपेक्ष चौकटच अशा पद्धतीने बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे. संविधानाचे चरित्र बदलण्याचाच हा प्रकार असल्याने देशात सामाजिक अस्थिरता निर्माण होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. रा.स्व. संघ देशाचा इतिहासच बदलण्याचे प्रयत्न करीत असल्याचा आरोप करून त्यांनी भाजपचे मंत्री आणि खासदार जातीय विधाने करीत असताना पंतप्रधान यावर गप्प राहात असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
मोदींनी काळे धन परत आणण्याची घोषणा केली होती, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनावर ५० टक्के नफा देण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात यापैकी एकही आश्वासन पाळलेले नाही. या उलट शेतीचे लागवड क्षेत्र झपाटय़ाने कमी होत असून ही बाब चिंताजनक असल्याची टीकाही येचुरी यांनी या वेळी केली.