सकाळी लवकर उठून मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजवायचे आहे, या विचाराने मोरूला रात्रभर झोपच आली नाही. एरवी मोरू जरा उशिराच उठतो, पण मतदानाला जायचे म्हणून तो लवकर उठला. सकाळी घराच्या वऱ्हांडय़ात त्याला वर्तमानपत्र दिसले, पण महापालिकेकडून येणार येणार म्हणून गाजावाजा झालेली मतचिठ्ठी कुठे दिसली नाही. मग मोरूने चिठ्ठीचा नाद सोडून दिला व थेट मतदान केंद्राचा रस्ता धरला. सकाळचे जेमतेम ८ वाजले होते. तरीही या केंद्रावरची मतदारांची रांग बघून मोरू कमालीचा सुखावला. लोक मतदानाला जात नाही, अशी कायम ओरड करणाऱ्यांना हे रांगेचे दृश्य दाखवायला हवे, असे त्याच्या मनात आले. केंद्रावर आल्यानंतर मोरूने मतचिठ्ठी वाटप करणारे महापालिकेचे कर्मचारी शोधायचा प्रयत्न केला, पण त्याला ते कुठेच दिसेना! तेथे वेगवेगळ्या उमेदवारांची चिठ्ठी वाटप केंद्रे लागलेली होती, पण भिडस्त स्वभावाच्या मोरूला या उमेदवारांच्या टेबलाकडे जायचा धीर होईना. उगीच एखाद्या उमेदवाराच्या टेबलजवळ गेलो तर आपला मतदानाचा कल स्पष्ट होईल, अशी भीती मोरूला वाटत होती. मग त्याने पालिकेचे चिठ्ठीवाटप केंद्र महत्प्रयासाने शोधून काढले. मोरू तेथे गेला, तर अनेकजण तेथील कर्मचाऱ्यांशी वाद घालताना दिसले. भ्रमणध्वनीत उतरवून घेतलेल्या आयोगाच्या अ‍ॅपवर नाव दिसत आहे, पण प्रत्यक्ष केंद्रावरच्या यादीत नावच नाही, आता चिठ्ठी तरी शोधून द्या, असा घोशा या वाद घालणाऱ्यांनी लावला होता. चिठ्ठीवाटपाची जबाबदारी असलेला कर्मचारी टेबलावर ठेवलेल्या चिठ्ठय़ांच्या ढिगाऱ्याकडे बोट दाखवत यातून शोधून घ्या, असे सांगून जबाबदारीपासून दूर पळत होता. या चिठ्ठय़ा प्रत्येकाच्या घरी येणार, असे जाहीर झाले होते. प्रत्यक्षात त्या आल्या नाहीच व आता हा कर्मचारी वरून मुजोरी करतो, हे बघून मोरूचा संताप अनावर झाला. तरीही त्याने स्वत:ला आवरले. सार्वजनिक ठिकाणी भांडण केले, तर आजवर जोपासलेली सभ्य नागरिक ही प्रतिमा धुळीस मिळेल, अशी भीती मोरूला वाटून गेली. वाद घालणारी मंडळी निघून गेल्यावर मोरूने त्या कर्मचाऱ्याला स्वत:चे नाव व पत्ता सांगितला. दिनवाणा चेहरा करून अगदी अदबशीर बोलणाऱ्या मोरूची त्या कर्मचाऱ्याला दया आली असावी. त्याने पुढाकार घेऊन मोरूची मतचिठ्ठी शोधून दिली. चिठ्ठी हातात आल्यावर मोरूला अर्धा गड सर केल्याचा आनंद झाला. आता मतदानासाठी घाई करायची नाही, असे ठरवत मोरूने मतदान केंद्राचा फेरफटका मारायला सुरुवात केली. तो उमेदवारांवर असलेल्या गुन्ह्य़ांचा फलक कुठे दिसतो का ते शोधू लागला. त्याने त्यासंबंधी एकदोघांना विचारलेही, पण त्यांनीही काय बावळट दिसतो हा, अशा अर्थाने मोरूकडे बघितले व उत्तर न देताच निघून गेले. मग मोरूने तेथे कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसाला विचारले. त्याने मोरूला आपादमस्तक न्याहाळले व असेल कुठेतरी असेल, असे सांगत कर्तव्यात ढवळाढवळ न करण्याचा सल्ला दिला.

मोरूने आजूबाजूच्या शंभर मीटर परिसरात भरपूर शोध घेतला तेव्हा त्याला तो फलक एका चिंचेच्या झाडाला टांगलेला आढळला. आता उमेदवारांचे चारित्र्य कळणार, या आनंदाने बेभान झालेला मोरू मोठय़ा आशेने फलकाजवळ गेला, पण तेथेही त्याचे दुर्दैव आड आले. मोरूची उंची कमी आणि फलक जास्त उंचीवर व त्यातील अक्षरे फारच बारीक असल्याने त्याला काय लिहिले ते वाचताच येईना. मोरूने उडय़ा मारून वाचण्याचा प्रयत्न केला, पण यश आले नाही. मग तो पुन्हा पोलिसाकडे गेला. फलक उंचीवर का? त्यातील अक्षरे एवढी बारीक का?, असे त्याचे दोन प्रश्न होते. वारंवार प्रश्न विचारणारा हा मतदार बघून खरे तर पोलीसदादाला राग आला होता, पण उगीच आज वाद कशाला म्हणून तो शांत राहिला. फलक कुणी काढून घेऊ नये म्हणून उंचीवर टांगला आणि उमेदवारांवर गुन्हे जास्त असल्यामुळे अक्षरे बारीक ठेवावी लागली, असे उत्तर त्याने मोरूला दिले. फलक दिसला ना, मग त्यात समाधान माना, असा शहाजोगपणाचा सल्लाही त्याने मोरूला दिला. तो सल्ला ऐकल्यावर मोरूने निमूटपणे मतदान केंद्राचे प्रवेशद्वार गाठले. आत गेल्यावर मोरू रांगेत उभा राहिला. प्रत्यक्ष मतदानाच्या खोलीत गेल्यावर मोरूला थोडे गोंधळल्यासारखे झाले. त्याची ही अवस्था बघताच तेथील एक कर्मचारी त्याच्यावर डाफरला. हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, शिस्तीतच पार पाडायचे असते, असेही त्याने मोरूला सुनावले. त्यामुळे मतदानप्रक्रिया राबवणारे कर्मचारी सुहास्य वदनाने आपले स्वागत करतील, हे मोरूने भल्या पहाटे बघितलेले स्वप्न तेथेच भंगले. मतदान कक्षात गेल्यावर चार मशिन्स बघून मोरूला आणखी गांगरल्यासारखे झाले. कधी एक, कधी दोन, तर कधी चार, हा प्रकार काय?, असा प्रश्नही त्याला पडला, पण लोकशाहीत हे चालायचेच म्हणून मोरूने पटापट बटणे दाबली व तो बाहेर पडला. मनावरचे मोठे दडपण दूर झाल्यासारखे त्याला वाटले.

आता जरा आजूबाजूचा फेरफटका मारावा म्हणून मोरू परिसरात फिरू लागला. थोडय़ा अंतरावर असलेल्या दुसऱ्या मतदान केंद्राजवळ गेला. तेथेही यादीचा घोळ व त्यावरून सुरू असलेला वाद रंगात आला होता. काही महिला तावातावाने भांडत होत्या. उमेदवारांचे प्रतिनिधी त्यांची समजूत घालत होते. अनेक मतदार मोठय़ा वाहनांमधून येताना त्याला दिसले. आपणही सकाळी उमेदवाराकडे वाहनाची मागणी केली असती तर ते मिळाले असते, असे क्षणभर मोरूला वाटून गेले.

मतदान केंद्रापासून शंभर मीटरच्या पलीकडे एका कोपऱ्यात एक आलीशान कार उभी होती. त्या कारजवळ काही लोक जात होते. हातातील कुपन आत दाखवत होते व मूठ बंद केलेला हात बाहेर काढून थेट खिशात टाकत होते. मतदानासाठी पैसे मिळतात, हे मोरूने अनेकदा वाचले होते. तो त्या कारजवळ गेला, पण तेथे उभ्या असलेल्या एका धाडधिप्पाड माणसाने मोरूला जोराचा झटका देत दूर ढकलून दिले. त्याची खूनशी नजर बघून मोरूला घाबरायला झाले. त्याच परिसरात अनेक ठिकाणी असे घोळके उभे होते, पण त्यांच्याजवळ जाण्याची हिंमत मोरूला झाली नाही. लोकशाहीच्या नावावर सुरू असलेला हा खेळ ठिकठिकाणी सुरू होता. तो दुरून बघत बघत मोरू घरी परतला तेव्हा दुपारचे ४ झाले होते. मोरूच्या पोटातकावळे ओरडायला लागले होते. कसेबसे दोन घास ढकलून मोरू झोपी गेला तेव्हा उद्याच्या कामाची चिंता त्याच्या मेंदूला सतवायला लागली होती.

devendra.gawande@expressindia.com