१५१च्या सभागृहात संख्या ८० वर;खुल्या प्रवर्गातूनही चार जागा जिंकल्या

महापालिका निवडणुकीत नागपुरात सहा प्रभागात महिलांनी खुल्या प्रवर्गातून पुरुष उमेदवाराला आव्हान दिले आणि चार ठिकाणी पराभूतही केले. त्यामुळे १५१ सदस्यांच्या सभागृहात महिलांची संख्या ८० वर पोहोचली असून महिला बहुमतात आहेत. महापौरपददेखील महिलासाठी राखीव आहे.

महिलांना राजकारणात समान संधी मिळावी म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्के आरक्षण देण्यात आले आहे. महापालिका निडणुकीच्या निकालावरून महिलांनी ‘आम्ही सक्षम’ असे सांगत चार ठिकाणी पुरुष उमेदवाराला पराभूत केले आहे. नागपूर महापालिकेत ३८ प्रभाग असून सदस्य संख्या १५१ आहे. त्यातील ७६ जागा महिलांसाठी राखीव आहेत. त्या व्यतिरिक्त सहा जागांवर महिला खुल्या प्रवर्गातून रिंगणात होत्या. त्यापैकी चार जागांवर पुरुषांना हरवण्यात यश आले.

पश्चिम नागपुरातील बहुचर्चित लढतीपैकी एक असलेल्या प्रभाग क्रमांक १३ मध्ये आमदार परिणय फुके यांची पत्नी परिणिती फुके यांनी दणदणीत विजय मिळावला. माजी उपमहापौर हिंमतराव सरायकर यांचे पुत्र संजय सरायकर यांचा त्यांनी मोठय़ा फरकाने पराभव केला. परिणिती फुके यांनी १२ हजार ९६१ मते घेतली तर सरायकर यांना ६ हजार ८०५ मते मिळाली. आमदार फुके हे विधान परिषदेचे सदस्य होण्यापूर्वी नगरसेवक होते. त्यांचा प्रभाव या भागात होता. त्याचा लाभ परिणिती फुके यांना मिळाला.

दक्षिण नागपुरातील प्रभाग क्रमांक ३३ मध्ये बसपाचा प्रभाव आहे. भाजपच्या वंदना भगत यांनी बसपाचे अजय डांगे आणि तीन वेळा नगरसेवक राहिलेले किशोर गजभिये यांना पराभूत केले. किशोर गजभिये पहिल्यांदा बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या तिकिटावर निवडून आले होते.

२०१२ च्या निवडणुकीत बहुजन समाज पक्षाकडून लढवत विजयी झाले होते. बसपाने निवडणुकीला काही महिने असताना गजभिये यांना निलंबित केले. गजभिये हे ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये सामील झाले होते. त्यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात बरिएमंच्या वंदना भगत या कमळ चिन्ह घेऊन मैदानात उतरल्या आणि गजभिये यांचा पराभव केला. गजभिये तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेले. वंदना भगत यांना ११ हजार ५२३ मते मिळाली आणि अजय डांगे यांना १० हजार १५५ मते प्राप्त झाली.

पश्चिम नागपुरातील प्रभाग क्रमांक १० मध्ये काँग्रेसच्या रश्मी उईके यांनी भाजपचे अरविंद गेडाम यांना मात दिली. भाजपच्या स्वाती आखतकर यांनी काँग्रेसचे आशिष चव्हाण यांना पराभूत केले. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण असल्याने दक्षिण-पश्चिम नागपुरातील तीन सदस्यांच्या प्रभाग क्रमांक ३८ मध्ये दोन महिला सदस्य आहेत.

प्रभाग क्रमांक १०

काँग्रेसच्या रश्मी उईके यांनी भाजपचे अरविंद गेडाम यांचा पराभव केला.

प्रभाग क्रमांक १३

काँग्रेसचे संजय सरायकर हे भाजपच्या परिणिती फुके यांच्याकडून पराभूत.

प्रभाग क्रमांक २९

भाजपच्या स्वाती आखतकर यांनी काँग्रेसचे आशिष चव्हाण यांना पराभूत केले.

प्रभाग क्रमांक ३३

भाजपच्या वंदना भगत यांनी बसपाचे अजय डांगे यांचा पराभव केला.