पुजाऱ्याच्या मुलावरही हल्ला
मंदिरातील दानपेटीतील पैसे चोरण्यासाठी शुक्रवारी मध्यरात्री अमरावती मार्गावरील अंबाझरी आयुध निर्माणी परिसरातील एका मंदिरातील पुजाऱ्याचा खून करण्यात आला. पुजाऱ्यांना वाचविण्यासाठी धावलेल्या त्याच्या मुलावरही चोरटय़ांनी हल्ला केला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
जगन मसराम कोडापे (५०, रा. मंदिराच्या समोर, डिफेन्स कॉलनी) असे मरण पावलेल्या पुजाऱ्याचे नाव आहे. तर राकेश जगन कोडापे (२६) असे जखमीचे नाव आहे. एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. आयुध निर्माणी परिसरात काली मातीचे एक मंदिर आहे. जगन कोडापे हे गेल्या पंधरा वर्षांपासून या मंदिरात पुजाऱ्याचे काम करतात. या कामात त्यांचे कुटुंबही त्यांची साथ देतो. कोडापे कुटुंब मूळचे गडचिरोलीचे आहे. काल शुक्रवारी रात्री दोघांनीही मंदिराची साफसफाई केली. मंदिराची साफसफाई करून ते मंदिरातच झोपले. त्यानंतर मध्यरात्री १२ ते १ वाजताच्या सुमारास तीन चोर मंदिरात शिरले आणि त्यांनी मंदिरातील दानपेटय़ा चोरल्या. मंदिरापासून काही अंतरावरच त्यांनी दानपेटी फोडून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दानपेटी फोडण्याच्या आवाजाने पुजारी आणि त्यांचा मुलाला जाग आली. त्यांनी दोघांनाही चोरांना विरोध केला असता त्यांनी एका लोखंडी रॉडने दोघांच्याही डोक्यावर वार केला. यात जगन यांचा मृत्यू झाला तर राकेश हा बेशुद्ध पडला. दोघेहीजण मेल्याचा समज झाल्याने चोर दानपेटीतील पैसे घेऊन निघून गेले. त्यानंतर आज सकाळी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. माहिती मिळताच वाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. राकेशचा श्वास सुरू असल्याने त्याला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले. तर जगण यांचा मृत्यू झाल्याने मृतदेह शवविच्छेदनासाठी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (मेयो) पाठवण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला.

तीन जणांना अटक?
या प्रकरणात पोलिसांना माहिती मिळताच तपासाला सुरुवात केली आणि तिघांना अटक केली. गणेश मोरे, केशव उर्फ केश्या पाटणे आणि पंजाबराव अशी आरोपींची नावे असल्याची माहिती आहे.