भाजपने विरोधी पक्षात असतांना शेतकरी, कष्टकरी, युवकांना बरीच स्वप्ने दखवून सत्ता मिळवली, परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सरकारचा अडीचा वर्षे होऊनही सर्वसामान्यांना लाभ होतांना दिसत नाही. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सर्वसामान्यांच्या न्यायाकरिता विदर्भातील विरोधी पक्ष आमदार आक्रमक होणार असून ते नोटबंदीमुळे सामान्यांचे होणारे हाल, वाढती बेरोजगारी, गुन्हेगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न लावून धरणार आहेत. शासनाला स्वतंत्र विदर्भावर भूमिका स्पष्ट करायला बाध्य करण्याचाही या आमदारांचा प्रयत्न असणार आहे.

माजी राज्यमंत्री व आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले की, सध्याचे सत्ताधारी विरोधी पक्षात असतांना हिवाळी अधिवेशन ४ आठवडे चालवण्याची मागणी करून आंदोलन करायचे, परंतु सत्तेवर आल्यावर केवळ २ आठवडय़ात ते अधिवेशन गुंडाळण्याच्या प्रयत्नात आहे. शासन म्हणून जनतेच्या प्रश्नाला उत्तर देणे शक्य नसल्याने हा प्रकार घडत आहे. विविध न्याय्य मागण्यांसाठी येणाऱ्या मोर्चाच्या शिष्टमंडळालाही विधिमंडळ परिसरात हे सरकार भेटणार नसून अजब दादागिरी करून सामान्यांचे प्रश्न दाबले जात आहेत. त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून हे प्रश्न लावून धरणार आहे. विदर्भातील गोसीखूर्द प्रकल्पाच्या सिंचन घोटाळ्यात त्यांच्याच पक्षाचे कंत्राटदार अडकल्याने त्यांच्यावर कारवाई होत नाही. हाही प्रश्न अधिवेशनात लावून धरू. विदर्भाच्या बऱ्याच भागात अतिवृष्टी व कीड लागल्याने सोसाबीन, कापूस, धान शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यांना भरपाईसह मोठय़ा प्रमाणावर बोनस देण्याची मागणी लावून धरली जाईल. स्वतंत्र विदर्भ राज्य देण्याचे आश्वासन देत भाजपने सत्ता मिळवली, परंतु सत्तेवर आल्यावर त्यांना विसर पडला आहे. तेव्हा शासनाला याविषयी भूमिका मांडण्यास भाग पाडू. ओबीसी विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशीपमध्ये वाढ करण्यासह या समाजाच्या आरक्षणाचा विषयही लावून धरण्यात येईल. या समाजाच्या विषयावर विरोधी पक्षात असतांना देवेंद्र फडणवीस यांनी स्वत आंदोलन केले होते, परंतु सत्तेत येताच त्यांनी घुमजाव करून या समाजाची फसवणूक केली आहे. वडेट्टीवार म्हणाले की, ओबीसी समाजाकरिता स्वतंत्र मंत्रालय व गोंडवाना विद्यापीठाकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड व शिक्षणाच्या होणाऱ्या भगवेकरणावर प्रश्न विचारला जाईल. शासनाला युवा धोरण नसून राज्यातील उद्योग बंद होत असल्याने बेरोजगारी वाढत आहे. त्यातच पूर्वी प्रत्येक वर्षी साडेपाच लाख रोजगार मिळत असतांना तोही राज्यात १ लाख ३५ हजारांवर आला आहे. आयटीसह विविध क्षेत्रात मंदीमुळे नोकऱ्या जात आहेत. हा विषय लावून धरला जाईल. आमदार गोपालदास अग्रवाल म्हणाले की, केंद्र सरकारने केलेल्या नोटाबंदीमुळे टपरीवर चहा विक्री करणाऱ्यांपासून सगळ्याच व्यावसायिकांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यांच्यापुढे निर्माण झालेला कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उचलून धरला जाईल. शासनाकडून गोंदियासह विविध भागात झालेल्या नैसर्गिक नुकसानीची भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु त्यांना त्याचा विसर पडल्याने हा प्रश्न उचलून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न असेल. सिंचन घोटाळ्यांसह विविध भ्रष्टाचार उघडकीस आणून दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन भाजपने दिले होते, परंतु सत्तेत असतांना काहीच होतांना दिसत नसल्याने त्यांच्या आरोपांवरच संशय उपस्थित होत आहे. हे सगळे मुद्दे आक्रमकपणे अधिवेशनात लावून धरू.

नागपुरात ११३ खून

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते आहे, परंतु संपूर्ण राज्यासह नागपुरातही कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचे चित्र आहे. शहरात गेल्या अडीच वर्षांत ११३ खून व ८२ अत्याचाराच्या घटना घडल्या असून महिलांच्या अत्याचारात राज्यात मोठी वाढ झाली आहे. विदर्भातही गुन्हे वाढले असून पोलिसांचे त्याकडे लक्ष नाही. तेव्हा विदर्भातील कायदा व सुव्यवस्थेचा विषय लावून धरणार असल्याचे आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले.

वीज दरवाढीचा जाब विचारणार -केदार

महागाईने सर्वसामान्य त्रस्त असतांना वीज दरात गेल्या अडीच वर्षांत घरगुती ते इतर सगळ्याच संवर्गात २० ते ३० टक्के दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत असतांनाही शासनाचे त्याकडे लक्ष नाही. भाजपच्या वतीने विरोधी पक्षात असतांना शेतकऱ्यांना दिवसाही वीज पुरवठा करण्याचे आश्वासन देत राज्यात सत्ता मिळवली, परंतु अद्याप कृषिपंपांमध्ये सकाळी पाणी दिसत नाही. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसून हे सगळे विषय विधानसभेत लावून धरू, असे आमदार सुनील केदार म्हणाले.

राणेंच्या आरोपाला पक्षाच्या व्यासपीठावर उत्तर -विखे

विधान परिषदेच्या निवडणुकीवरून काँग्रेस नेते राणे यांनी केलेल्या जाहीर आरोपला आपण पक्षाच्या व्यासपीठावर उत्तर देऊ. अशा मुद्यांवर जाहीरपणे वक्तव्य करता येणार नाही, असे काँग्रेस नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत त्यांना राणे यांच्या टीकेबद्दल विचारले असता ते म्हणाले की, आपण विरोधी पक्षनेता आहोत, त्यामुळे आपल्याला काही आचारसंहिता आहे. राणे यांनी केलेल्या टीकेची माहिती आहे व त्यावर आपण पक्षाच्या चौकटीतच उत्तर देऊ. यासंदर्भात राणे यांच्याशीही बोलणे झाले असून त्यांनाही जाहीर वक्तव्य न करण्याची विनंती केली आहे. सिंचन घोटाळ्याच्या चौकशीची आम्ही सुरुवातीपासूनच ही मागणी करीत आहोत. या मुद्यावर भाजपनेच संपूर्ण राज्यात रान पेटविले होते. मात्र, सत्तेत आल्यावर तेच शांत झाले आहेत. त्यांच्याच पक्षाचे नेते यात सहभागी झाल्याचे दिसून आल्यावर त्यांनी ही भूमिका घेतली.

मंत्र्यांकडून गोपनीयतेचा भंग -मुंडे

राज्य मंत्रिमंडळातील सदस्य विष्णू सावरा, महादेव जानकर आणि महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून गोपनीयतेचा भंग झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. मराठवाडय़ात एका सार्वजनिक कार्यक्रमात जानकर यांनी नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांबाबत अपशब्द काढले. गावाचे वाटोळे करण्याची भाषा केली. ‘आम्हीच लोकांना मारहाण करतो व त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना तडीपार करतो’ असे बोलताना पंकजा मुंडे यांची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. विष्णू सावरा यांनीही कुपोषित बालकांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी पाठराखण केली जात आहे, याबाबत आपण सरकारला जाब विचारू, असे मुंडे म्हणाले. नगर पालिका निवडणुकीत भाजपला विदर्भ वगळता राज्याच्या इतर भागात फारसे यश मिळाले नाही. नगराध्यक्षपदाच्या त्यांनी जिंकलेल्या ५० जागांपैकी त्यांना २६ ठिकाणी बहुमत नाही, असे मुंडे म्हणाले. एमआयएम आणि मतविभाजन याचा काही ठिकाणी भाजपला फायदा झाल्याचे ते म्हणाले.

विरोधकांकडून टीकेसाठी मालिका व सिनेगीताचा आधार

सरकारच्या कामकाजावर टीका करण्यासाठी रविवारी दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेत्यांनी टीव्ही मालिका, चित्रपट गीत आणि त्यातील संवादाचा आधार घेतला.

विखे पाटील यांनी सरकारची खिल्ली उडविताना त्यांची तुलना मुलांची लोकप्रिय मालिका डोरेमॉनच्या मालिकेशी केली. नोटाबंदीच्या निर्णयावर टीका करताना त्यांनी ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या ‘ ऐ जाने वफा ये जुल्म न कर’ या गाण्याचा दाखला दिला. धनंजय मुंडे हे सुद्धा याबाबतीत मागे नव्हते. नोटाबंदीच्याच मुद्यावर त्यांनी हिंदी चित्रपट ‘शराबी’तील प्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या एका संवादाची आठवण करून दिली.