नागपूर महापालिकेत पक्षाकडे ३८ प्रभागात चार हजारांवर अर्ज

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. यावेळीही महापालिका निवडणुकीसाठी संघाचे स्थानिक पदाधिकारी उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांच्या यादीत आहेत. संघ स्वयंसेवकांना उमेदवारी दिली तर पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले जाण्याची शक्यता असल्यामुळे भाजपच्या निवड समिती समोरील अडचणी वाढल्या आहेत.

संघाच्या अधिकाऱ्यांकडून एखादा आदेश आला की भाजपकडून त्याची अंमलबजावणी केली जाते. त्यामुळे भाजपच्या अनेक इच्छुक उमेदवारांनी गेल्या काही दिवसांपासून संघात जाणे सुरू केले होते. कधी नव्हे ते काही भाजपचे कार्यकर्ते संघाच्या विजयादशमी कार्यक्रमात गणवेशात सहभागी झाले होते. त्यामुळे भाजपकडून नाही तर संघाकडून उमेदवारी मिळेल, या आशेने अनेक कार्यकर्ते आस लावून बसले असताना आता संघ स्वयंसेवक आणि त्यातही संघाच्या जबाबदाऱ्या असलेले पदाधिकारी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे पक्षाचे अनेक निष्ठावंत असलेल्या इच्छुक कार्यकत्यार्ंसमोरच्या उमेदवारी मिळण्याबाबतच्या अडचणी वाढल्या आहे. ज्या संघ स्वयंसेवक पदाधिकाऱ्यांची नावे इच्छुकांच्या यादीत आहेत त्यातील अनेकांनी गेल्या काही प्रचारक म्हणून काम केले आहे. संघ विस्ताराच्या कामाची त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली होती. मात्र संघ स्वयंसेवक म्हणून समाजकार्य करण्यापेक्षा नगरसेवक होऊन समाजसेवा करावी या उद्देशाने काही स्वयंसेवक निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे भाजपची निवड समिती अशा स्वयंसेवकांचा विचार करण्याची शक्यता आहे. बजरंग दलामध्ये गेल्या अनेक वषार्ंपासून कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून त्यांचेही संघाच्या माध्यमातून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू आहेत.

भाजपच्या मुलाखती आटोपल्या आहेत. प्रत्येक प्रभागातील सक्षम आणि पक्षामध्ये सक्रिय असलेल्या इच्छुकांची यादी वेगळी केली जात आहे.

परिवारातीलच अनेक इच्छुक

महापालिकेची रणधुमाळी सुरू झाली आहे. ३८ प्रभागांसाठी भाजपकडे चार हजारांच्या जवळपास इच्छुकांचे अर्ज आले आहेत.  त्यातील काही इच्छुक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्थानिक पदाधिकारी असून त्यांनी मुलाखती दिल्या आहेत. याशिवाय बजरंगदल, विश्व हिंदू परिषद, भारतीय मजदूर संघ, शिक्षक भारती, संस्कार भारती या संघाशी संबंधित असलेल्या कार्यकर्त्यांचा भाजपच्या इच्छुकांच्या यादीत समावेश आहे.