संजीवन वृद्धाश्रमास मुख्यमंत्र्यांची भेट
वाढते शहरीकरण आणि परिवारातील विभक्तपणामुळे ज्येष्ठ नागरिकांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्यात २०१३ मध्ये धोरण तयार करण्यात आले होते. मात्र त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. सरकार याबाबत त्वरित शासन निर्णय जारी करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
संजीवन सोशिओ-मेडिकल फाऊंडेशनच्या आमगाव (देवरी) येथील संजीवन वृद्धाश्रमास फडणवीस यांनी रविवारी भेट दिली. भाग्यश्री स्मृती वृद्ध सहनिवास व दिवंगत अशोक वाडिभस्मे दालनाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तुमाने, आमदार सुधाकर देशमुख व संस्थेचे प्रमुख डॉ. संजय उगेमुगे यावेळी उपस्थित होते.
ज्येष्ठ नागरिकांना वाऱ्यावर सोडून न देता संजीवन या संस्थेने लोकसेवेचे व्रत मानून त्यांचे संगोपन केले ही कौतुकास्पद बाब असल्याचे फडणवीस म्हणाले. आश्रमाच्या निसर्गरम्य वातावरणात महात्मा गांधी यांना अभिप्रेत असलेल्या ग्रामोविज्ञानाच्या सर्व संकल्पना साकारल्यामुळे येथून समाजाला नवी दिशा देण्याचे कार्य होते, असे ते म्हणाले.
फडणवीस यांनी वृद्धाश्रम परिसरातील शिवालय, वृद्धांसाठी असलेले कुटीर, गो-शाळा, अपारंपारिक ऊर्जा आणि पर्यावरण प्रकल्प, रुग्णालय तसेच विविध विकास प्रकल्पांना भेट दिली. ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासनाने जिल्हास्तरावर कक्ष सुरू करावे तसेच ज्येष्ठ नागरिक हेल्थ कार्ड यासारखी योजना सुरू करावी, अशी विनंती डॉ. संजय उगेमुगे यांनी यावेळी केली. कार्यक्रमाला माजी मंत्री रमेश बंग, विजय घोडमारे, विभागीय आयुक्त अनुपकुमार, मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण दराडे, नासुप्रचे सभापती श्याम वर्धने, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, डॉ. आढाव, डॉ. चंद्रशेखर मेश्राम, प्रशांत उगेमुगे उपस्थित होते.