उपराजधानीचा पहिल्या २० शहरांमध्ये ‘स्मार्ट सिटी’ म्हणून समावेश करण्यात आला नाही, या अपयशाचे खरे मानकरी कोण आहेत?, कुणाच्या चुकीमुळे शहराचा समावेश करण्यात आला नाही?, या विषयांवर चर्चा व्हावी, अशी मागणी विरोधकांनी केली असताना सभागृहाने त्यास नकार दिल्यामुळे काँग्रेसच्या सदस्यांनी घोषणा देत काही वेळ गोंधळ घातला आणि त्यानंतर सभात्याग करून कामकाजावर बहिष्कार टाकला.
महापालिके च्या सर्वसाधारण सभेमध्ये प्रश्नोत्तरे आणि स्थायी समिती सदस्यांची निवड झाल्यानंतर स्मार्ट सिटीचे अपयशावर चर्चा व्हावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांनी केली. मात्र, त्यांच्या मागणीला सत्तापक्षाकडून विरोध करण्यात आला. महापौर प्रवीण दटके यांनी अशा वेळेवर आलेल्या विषयावर चर्चा करता येत नसल्याचे सांगितले. पुढच्या सभेत स्मार्ट सिटीचा प्रस्ताव आणा आणि त्यावर चर्चा करू, असे त्यांनी सांगितले. मात्र, विरोधी पक्षाचे समाधान झाले नाही. त्यामुळे त्यांनी महापौरांसमोर येऊन घोषणा देणे सुरू केले. आधी स्मार्ट सिटीवर चर्चा करा आणि त्यानंतरच अन्य विषयांवर चर्चा घ्या, अशी मागणी प्रफुल्ल गुडधे यांच्यासह काही विरोधी पक्षांच्या सदस्यांनी केली. मात्र, सत्तापक्षाने त्यांची मागणी फेटाळली. त्यामुळे काही गोंधळ झाला आणि या गोंधळातच विरोधी पक्षाच्या सर्व सदस्यांनी कामकाजावर बहिष्कार टाकून सभात्याग केला. त्यानंतर सभागृहात अन्य विषयावर चर्चा होऊन अनेक विषय बहुमताने मंजूर करण्यात आले असले तरी त्यावेळी विरोधी पक्षाचे सदस्य सभागृहात उपस्थित नव्हते.
यावेळी विरोधी पक्षनेते विकास ठाकरे म्हणाले, स्मार्ट सिटीचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी ज्यावेळी सभागृहात चर्चेसाठी आला होता, त्यावेळी शहराच्या विकासाच्या दृष्टीने विरोधी पक्षाने सहकार्याची भावना ठेवत तो प्रस्ताव एकमताने मंजूर केला. गेल्या अनेक दिवसांपासून स्मार्ट सिटीबाबत शहरात वातावरण तयार करण्यात आले असून त्यावर कोटय़वधी रुपये खर्च करण्यात आले. आराखडा तयार करून केंद्राला पाठविण्यात आला. नागपूर शहराचा पहिल्या २० शहरांमध्ये समावेश करण्यात आला नाही त्यामुळे या अपयशाला कोण कारणीभूत आहे, केंद्राच्या निर्देशाप्रमाणे कोणत्या त्रुटी होत्या, त्याची जबाबदारी कोणावर होती, त्यांनी काय केले आणि काय केले नाही, या सर्व विषयांवर सभागृहात चर्चा व्हावी, अशी मागणी केली. मात्र, सत्तापक्ष अपयश समोर येईल म्हणून ते चर्चा करायला तयार नसल्यामुळे त्याचा निषेध करून बहिष्कार टाकला.
सभागृहात चर्चा करण्यासाठी प्रस्तावाची गरज नाही. वेळेवर अनेक विषयांवर चर्चा होत असते. त्यामुळे आजही ती व्हायला हवी होती. १६ फेब्रुवारीला महापालिकेसमोर काँग्रेस स्मार्ट सिटीचे अपयश या विषयावर धरणे आंदोलन करणार आहे.

‘स्मार्ट सिटी’ म्हणून नागपूरचा समावेश करण्यात आला नाही, याचे दुख आहे. त्याची कारणे शोधून पुन्हा नव्याने प्रस्ताव पाठविणार आहोत. सभागृहात चर्चेसाठी प्रस्ताव आणावा लागतो. आयत्या वेळी आलेल्या विषयावर चर्चा शक्य नाही. स्मार्ट सिटीवर आमची चर्चेची तयारी आहे. विरोधी पक्षाला ते सांगण्याचा प्रयत्न करू. मात्र, त्यांनी ऐकले पाहिजे. पुढच्या सभागृहात विरोधी पक्षाने प्रस्ताव दिला नाही तर प्रशासनाकडून तो विषय आणला जाईल आणि त्यावेळी चर्चा होईल.
-प्रवीण दटके, महापौर