शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी येथे ‘कृषी अधिवेशन २०१७’चे आयोजन करण्यात आले आहे.  शिवसेनेचे राज्यातील मंत्री, खासदार व आमदारांचे स्वीय साहाय्यक आदी या अधिवेशनाला येणार असल्याने त्यांची शासकीय विश्रामगृहातील  कक्ष नोंदणी करताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाल्याचे चित्र येथे पाहायला मिळाले.  शेतकऱ्यांसंबंधित विषयावर कार्यक्रम असल्याने आलिशान हॉटेलमध्ये व्यवस्था करण्याचे टाळून सर्व जणांनी विश्रामगृहाचा आग्रह धरल्याने  हे अधिवेशन शासकीय विश्रामगृहाची व्यवस्था पाहणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची मात्र, परीक्षा पाहणारे ठरले.

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘कृषी अधिवेशन २०१७’चे आयोजन करण्यात आले आहे.  या विश्रामगृहात दस्तुरखुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह सेनेचे सर्व मंत्री, मंत्रिपदाचा दर्जा असणाऱ्या व्यक्ती या अधिवेशनास येणार आहेत. अधिवेशनातील विषय शेतकऱ्यांचा असल्याने या मान्यवरांसाठी पक्षाने हॉटेलमध्ये व्यवस्था केली नाही. त्यामुळे सर्वानी येथील शासकीय विश्रामगृहाकडे धाव घेतली.

विश्रामगृहात विशेष व्यक्तींसाठी निवासी कक्षांची संख्या जवळपास २५ आहे. उर्वरित २० ते २५ कक्ष सर्वसाधारण आहेत. ‘प्रोटोकॉल’नुसार त्याचे वितरण केले जाते. काही कक्ष राखीव ठेवावे लागतात. वरिष्ठ नेते व मंत्री यांना अतिविशेष कक्ष देताना त्यांच्यासमवेत असणारे साहाय्यक, सुरक्षा यंत्रणा यांना वेगळा कक्ष उपलब्ध करावा लागतो. ती व्यवस्था करताना कर्मचाऱ्यांची तारांबाळ उडाली.

कोणी व्हॉट्सअ‍ॅपवर तर कोणी फॅक्सद्वारे पत्र पाठविणे, मंत्रिमहोदयांच्या दौऱ्याचे कार्यक्रम कळविणे, दूरध्वनीद्वारे पाठपुरावा करणे, असे नाना प्रकार शासकीय विश्रामगृहात कक्ष नोंदणीसाठी करण्यात आले. नियमानुसार केवळ १२ ते १५ मान्यवरांसाठी कक्ष नोंदणी झाली. नव्याने येणाऱ्यांना कक्ष शिल्लक नसल्याने कर्मचारी कात्रीत सापडले होते.

यांची झाली कक्ष नोंदणी

सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आजवर शासकीय विश्रामगृहात कधीही थांबलेले नव्हते. नाशिक दौऱ्या वेळी त्यांचा मुक्काम शहराच्या प्रवेशद्वारावरील पंचतारांकित हॉटेलमध्ये असतो. अधिवेशनानिमित्त प्रथमच ते विश्रामगृहातील विशेष मान्यवरांसाठीच्या कक्षाची अनुभूती घेणार आहेत.  उद्धव ठाकरे यांच्यासह दिवाकर रावते, एकनाथ शिंदे, दीपक सावंत, रामदास कदम, दादा भुसे, दीपक केसरकर, गुलाबराव पाटील, संजय राठोड, विजय शिवतारे या मंत्र्यांसह आनंदराव अडसूळ, मृणाल गोरे आदींची कक्ष नोंदणी झाल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.

कक्ष नोंदणीसाठी दोन दिवसांत ४० पत्रे

मराठवाडय़ासह इतर भागांतील काही आमदारांनी कक्ष नोंदणीसाठी चक्क समाजमाध्यमांवरून पत्र पाठविले. व्हॉट्सअ‍ॅपवर पत्र पाठवून कक्ष नोंद होणार नसल्याचे अधिकाऱ्यांना सांगावे लागले. बांधकाम विभागाच्या कार्यालयात दोन दिवसांत फॅक्सद्वारे कक्ष नोंदणीसाठी ३० ते ४० पत्रे आली.  यामुळे कक्षासाठी प्राप्त झालेली पत्रे आणि उपलब्ध कक्ष यांच्यात कमालीची तफावत निर्माण झाली. अखेर सेनेचे प्रमुख नेते, मंत्री यांच्या नोंदणीने विश्रामगृह ‘हाऊसफुल्ल’ झाले आहे. यामुळे उर्वरित आमदार व पदाधिकाऱ्यांना कक्ष देणे अवघड ठरणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. संबंधितांची समजूत काढताना कर्मचाऱ्यांची मात्र, दमछाक झाली आहे.

राज्यभरातून येणारे आमदार व पदाधिकाऱ्यांसाठी पक्षाने हॉटेलमध्ये कोणतीही व्यवस्था केलेली नाही. शेतकऱ्यांशी संबंधित संवेदनशील विषयावर हे अधिवेशन आहे. त्यात साधेपणा जपला जात आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व सर्व मंत्री विश्रामगृहात थांबणार आहेत. एकदिवसीय अधिवेशन असल्याने सेनेचे पदाधिकारी व आमदार कोणी मुक्कामी राहणार नाहीत. यामुळे निवासव्यवस्थेचा प्रश्न भेडसावणार नाही.

अजय बोरस्ते (महानगरप्रमुख, शिवसेना)