इगतपुरीतील मिस्टिक व्हॅली रिसॉर्ट प्रकरण

मुंबई-आग्रा महामार्गावर इगतपुरी शहरातील मिस्टिक व्हॅली रिसॉर्टमधील बंगल्यात रंगलेल्या ‘बॅचलर पाटी’चे आयोजन नेमके कसे झाले, याचा शोध तपास यंत्रणा संशयितांच्या भ्रमणध्वनी क्रमांकाच्या आधारे घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी संशयितांच्या क्रमांकाचे अहवाल मागविले जाणार असून कोणी कोणाशी कसा संपर्क साधला याची तपासणी केली जाणार आहे. पार्टीत नाचणाऱ्या युवतींवर संशयितांनी पैशांची उधळपट्टी केली होती. घटनास्थळावरून पोलिसांनी युवतींसह १२ जणांना अटक केली. त्यात उच्चभ्रु व प्रतिष्ठितांचा समावेश आहे. या पार्टीत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मुलाचांही सहभाग असल्याची चर्चा होत असली तरी पोलीस यंत्रणेने त्यास नकार दिला. ज्या रिसॉर्ट आणि बंगल्यात ही पार्टी झाली, त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याने स्थानिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

कसारा घाटातील दऱ्या खोऱ्यांच्या परिसरात मिस्टिक व्हॅली रिसॉर्टमधील पार्टीतील कारवाईविषयी वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहे. कारवाईनंतर पोलिसांनी या घटनाक्रमाविषयी गुप्तता बाळगली.

प्रारंभी कोणी अधिकारी या संदर्भात बोलण्यास तयार नव्हते. ११ क्रमांकाच्या बंगल्यात ही पार्टी रंगली. काही तरुणी अश्लील हावभाव करून नाचत होत्या. त्यांच्यावर संशयित नोटांची उधळण करत होते. घटना स्थळावरून पोलिसांनी ५७ हजार रुपये रोख जप्त केले. त्यात काही दहा रुपयांच्या बनावट नोटाही आहेत. तसेच मारुती इर्टिगा, लॅपटॉप, दोन ध्वनिवर्धक, एक अ‍ॅम्प्लिफायर, मद्याचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी नाशिक, पुणे ठाणे येथील बांधकाम व वैद्यकीय व्यावसायिकांना अटक करण्यात आली. या एकंदर कारवाईबद्दल वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या जात आहेत. संशयितांमध्ये काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मुलाचाही समावेश होता, परंतु, त्यांच्यावर कारवाई झाली नसल्याच्या चर्चेला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तथ्यहीन ठरवले. पोलीस यंत्रणेने रितसर गुन्हा दाखल करत कारवाई केली. संशयितांची जामीनावर सुटका झाली असली तरी या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. संशयित सनदी व पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नातेवाईक आहेत काय यावर यंत्रणेने गुन्हेगारांवर कारवाई करताना तशा कोणत्याही संबंधाचा विचार होत नसल्याचे स्पष्ट केले. संशयितांची जामीनावर मुक्तता झाली असली तरी गरज भासल्यास तपासासाठी संबंधितांना परत बोलावले जाऊ शकते.

या पार्टीचे ऑनलाईन आयोजन झाल्याचे सांगितले जाते. रंगीन पार्टीबद्दल गुन्हा दाखल करताना रिसॉर्ट व बंगला भाडेतत्वावर देणारा मालक दोघेही नामानिराळे राहिल्याचे दिसते. रिसॉर्टच्या परिसरातील बंगले मालकांच्या संमतीने भाडे तत्वावर दिले जातात.

त्या स्वरुपाचा करार उभयतांमध्ये झाला असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. मुंबईतील एका व्यक्तीशी संशयितांपैकी कोणीतरी संपर्क साधून पार्टीचे आयोजन केल्याचा अंदाज आहे. त्याकरिता संशयितांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावरून कोणाकोणाशी संपर्क साधला गेला याची सविस्तर माहिती भ्रमणध्वनी कंपन्यांकडून मागविण्यात येणार आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पार्टीच्या आयोजनाबद्दलचा उलगडा होईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.