१०८ फूट उंचीच्या भगवान ऋषभदेव यांच्या पूर्णाकृती मूर्तीने संपूर्ण जगाचे लक्ष श्रीक्षेत्र मांगीतुंगीकडे वेधले गेले आहे. या ठिकाणी पुढील काळात जैन धर्मीयांसह पर्यटकही आवर्जून भेट देतील. या क्षेत्राच्या विकासासाठी शासनाने विविध कामे केली आहेत. आगामी काळात मांगीतुंगी हे धार्मिक तीर्थक्षेत्राबरोबर पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास येईल, असे प्रतिपादन विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांनी केले. बागलाण तालुक्यातील जैन धर्मीयांचे पवित्र श्रीक्षेत्र मांगीतुंगी येथील पर्वतावर भगवान ऋषभदेव यांच्या १०८ पूर्णाकृती मूर्तीच्या प्रतिष्ठापना व महामस्ताभिषेक सोहळ्यासह अन्य धार्मिक विधींना गुरुवारी ध्वजारोहणाने उत्साहात सुरुवात झाली. शनिवारी या सोहळ्यास भाजपचे अध्यक्ष अमित शहा हजेरी लावणार असून याच दिवशी मुख्यमंत्रीही दाखल होणार असल्याने प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू झाली आहे.
या सोहळ्यानिमित्त स्वागत कमानी, पथदीप, रोषणाई, ध्वज, पताकांनी सजलेल्या मांगीतुंगी नगरीत देशभरातून जैनधर्मीय भाविकांचे आगमन होण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी जवळपास ५० हजार भाविक या ठिकाणी दाखल झाल्याचा अंदाज आहे. सप्ताहभर चालणाऱ्या या सोहळ्यास ध्वजारोहणाने सुरुवात झाली. या वेळी बागडे यांच्यासह मूर्ती निर्माण समितीच्या पदाधिकारी सरिता जैन उपस्थित होत्या. या सोहळ्यानंतर मांगी-तुंगी या दोन्ही पर्वतांच्या पायथ्याशी उभारलेल्या भव्य सभा मंडपाचे उद्घाटन बागडे यांच्या हस्ते करण्यात आले. ऋषभदेव यांच्या मूर्तीमुळे जगाचे लक्ष या क्षेत्राकडे वेधले गेले आहे. या क्षेत्राकडे श्रद्धाक्षेत्र म्हणून पाहिले जाईल. या क्षेत्राच्या विकासासाठी राज्य शासनाने भरीव निधी उपलब्ध करून विकास कामे केली. पुढील काळात आणखी सुविधा उपलब्ध केल्या जातील, असे बागडे यांनी नमूद केले. या तीर्थक्षेत्राचा पर्यटन क्षेत्र म्हणून विकास होईल. त्याद्वारे स्थानिकांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार असल्याचे ते म्हणाले. मुलींच्या घटत्या जन्मदराबाबत चिंता व्यक्त करत त्यांनी ‘बेटी बचाव’ अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले. ध्वजारोहणानंतर धार्मिक विधींना सुरुवात झाली. परंपरेनुसार दान देणाऱ्यास पूजाविधीत अग्रक्रम दिला जातो. पहिल्या विधीसाठी तीन जणांनी प्रत्येकी अकरा लाखांची देणगी दिल्याचे संयोजकांकडून सांगण्यात आले. अडीचशे एकर भूखंडावर साकारलेल्या निवासस्थानांमध्ये भाविकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे.
शनिवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार की नाही याची अद्याप स्पष्टता झालेली नाही. बडय़ा राजकीय नेत्यांच्या दौऱ्यामुळे प्रशासकीय यंत्रणेची धावपळ सुरू झाली आहे.
संशयास्पद हालचालींवर नजर ठेवण्यासाठी ६० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच भाविकांच्या वाहतुकीसाठी विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावरील फाटय़ापासून १५० एसटी बसगाडय़ांचा ताफा सज्ज आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बॉम्बशोधक व नाशक पथक, १०० पोलीस अधिकारी, ८०० पोलीस कर्मचारी, दंगा नियंत्रण पथक कार्यरत आहेत.