नाशिक रोड येथे पूर्ववैमनस्यातून कृत्य; गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ
शहरातील कायदा व सुव्यवस्था ढासळत असल्याचे वारंवार अधोरेखित होत असताना मंगळवारी रात्री मागील भांडणाची कुरापत काढून टोळक्याने गोळी झाडून एकाची हत्या करण्याची घटना नाशिकरोड परिसरात घडल्याने खळबळ उडाली आहे. आर्टिलरी सेंटर रस्त्यावर रात्री एकच्या सुमारास हा प्रकार घडला. मृत व्यक्ती मालमत्ता खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत होती. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोळीबाराच्या घटनेने नाशिकची वाटचाल कोणत्या दिशेने सुरू आहे, याची धास्ती सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे.
टवाळखोरांचा धुडगूस, लुटमार, खून, हाणामारी, वाहनांची जाळपोळ या घटनांमुळे गुन्हेगारीचा आलेख उंचावत असताना पोलीस ठाण्यालगत खुनाच्या घटना घडूनही राजाश्रय लाभलेले संशयित पोलिसांच्या हाती लागत नाही, अशी स्थिती आहे. काही वर्षांपूर्वी गुन्हेगारांचे शहर अशी जी नाशिकची ओळख होती, ती मध्यंतरीच्या काळात पुसली गेली. तथापि, गेल्या काही महिन्यांत घडणाऱ्या घटना पाहिल्यास ही ओळख पुन्हा प्राप्त होते की काय, अशी शंका नागरिकांकडून व्यक्त होत आहे. नाशिकरोडमध्ये घडलेल्या घटनेने या घटनाक्रमात नव्याने भर पडली. नाशिकरोड भागात मालमत्ता खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणारे रणजित जगशरण मंगवाना यांची जैन भवनच्या प्रवेशद्वारासमोर चार संशयितांनी गोळ्या झाडून हत्या केली. याप्रकरणी मंगवाना यांची पत्नी गीता यांनी तक्रार दिली आहे.
जयभवानी रस्त्यावरील फर्नाडिस वाडी येथे वास्तव्यास असणारे रणजित मंगवाना हे रात्री पाऊणच्या सुमारास घरी आले. त्या वेळी संशयित रोहित ऊर्फ माले गोविंद डिंगम, मयूर चमन बेद, संजय ऊर्फ मॉडेल चमन बेद, विनोद राजाराम साळवे हेदेखील घरी आले आणि त्यांनी मंगवाना यांच्याशी काही चर्चा केली. त्यानंतर मंगवाना कपडे बदलून त्यांच्यासमवेत जात असताना पत्नी व आईने मनाई केली. परंतु कोणाचे काही न ऐकता मंगवाना दुचाकीवरून त्यांच्यासोबत निघून गेले. या एकंदर प्रकाराचा संशय आल्याने मंगवाना यांची बहीण व पत्नीने या सर्वाचा पाठलाग केला. त्या वेळी मंगवाना व चौघे संशयित आर्टिलरी रस्त्यावरील जैन मंदिरासमोर थांबलेले दिसले. या ठिकाणी संशयितांनी मागील भांडणाची कुरापत काढून मंगवाना यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. पत्नी व बहिणीने सोडविण्याचा प्रयत्न केला. परंतु संशयित रोहित ऊर्फ माले गोविंद डिंगम ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. त्याने पिस्तूल काढून मंगवाना यांच्या डोक्यात गोळी झाडली. मंगवाना जमिनीवर कोसळल्यावर संशयितांनी पलायन केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. रात्रीची वेळ असल्याने आरडाओरड करूनही मदतीसाठी कोणी आले नाही. काही वेळाने पोलिसांचे गस्ती वाहन आल्यावर मंगवाना यांना बिटको रुग्णालयात हलविण्यात आले, परंतु तत्पुर्वीच त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेमुळे उपरोक्त भागात तणावाचे वातावरण आहे.

पोलिसांचा वचक संपला
गुन्हेगारींच्या घटना दिवसागणिक वाढत आहेत. दोन दिवसांपूर्वी जागेच्या वादातून एका अल्पवयीन गुन्हेगाराने शेतमजुराचा खून केल्याची घटना घडली होती. ३१ डिसेंबरच्या रात्री सातपूर पोलीस ठाण्यालगत पी. एल. ग्रुपच्या कार्यालयात संशयितांनी दोघांची हत्या केली होती. या प्रकरणातील नगरसेवकपुत्र भूषण लोंढे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. तत्पूर्वी पंचवटीतील चौकीत वाद मिटविण्यासाठी बोलाविलेल्या टोळक्याने एकावर पोलिसांसमक्ष हल्ला चढविल्याची घटना घडली होती. या घडामोडींमुळे पोलिसांचा काही वचक शिल्लक आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.