प्रशासनाच्या वेळकाढू धोरणामुळे वीज कंपन्यांमधील कर्मचारी, अभियंते व अधिकारी यांचे अनेक दिवसांपासून प्रलंबित प्रश्न मार्गी लागलेले नाहीत. वीज कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कामगार संघटनात्मक संयुक्त कृती समितीतर्फे ७ जून रोजी राज्यभर संप करण्यात येणार आहे. या संपात नाशिक येथील वीज कर्मचारीही सामील होणार असून तत्पूर्वी २ व ६ जून रोजी येथे द्वारसभा होणार आहेत.

नाशिकरोड येथील वीज भवनसमोर महाराष्ट्र राज्य वीज कामगार, अभियंते, अधिकारी, संघटना संयुक्त कृती समितीतर्फे नुकतीच द्वारसभा झाली. या सभेत महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिकसिटी वर्कर्स फेडरेशनचे व्ही. डी. धनवटे यांनी मार्गदर्शन केले. वीज कंपन्यातील कर्मचारी, अभियंते व अधिकारी यांना निवृत्तिवेतन व स्वेच्छानिवृत्ती योजना लागू करावी, बदल्यांविषयी चर्चेनुसार धोरण ठरवावे, राज्यभर सुरू असलेल्या निलंबनाच्या कारवाया बंद करा, पन्नास वर्षांवरील वीज कामगार व अधिकाऱ्यांनी पदोन्नती नाकारल्यास ‘जीओ ७४’ चा लाभ सुरू ठेवावा, एकतर्फी होणारे प्रशासकीय बदल थांबवावे, मयत कामगारांच्या वारसांना  कंपनीत विनाअट कायम नोकरीत सामावून घेणे, रोजंदारी कामगारांची सेवा ज्येष्ठता कायम ठेवावी, कंपनीत कर्मचारी रचना संघटनांनी सादर केल्याप्रमाणे ठेवावी आदी मागण्यांसाठी कृती समितीतर्फे जेलरोड येथील महापारेषण परिमंडळ कार्यालय व नाशिकरोड येथील वीज भवनासमोर २ व ६ जूनला द्वारसभा होणार आहेत. ७ जूनला शून्य प्रहरपासून ९६ हजार वीज कामगार अधिकारी व अभियंते लाक्षणिक संपात सहभागी होणार आहेत. या वेळी धनवटे यांसह जी. एस. वाघ, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे आर. जी. देवरे, नंदू नागपुरे, प्रमोद निकम आदी उपस्थित होते.