‘शिवकार्य गडकोट’ ची बंदूकधारी वनरक्षक नेमण्याची मागणी

जिल्ह्यतील अचलागडच्या माथ्यावर, किल्ले रामशेजच्या पूर्व पायथ्याशी, तसेच घोटीच्या उत्तरेतील डोंगररांगांवर मोठय़ा प्रमाणात वणवे लागल्याने नसíगक हानी झाली आहे. दुष्काळामुळे पर्यावरण वाचविण्यासाठी अनेक संस्था, संघटना, दुर्गसंवर्धन चळवळी प्रयत्न करत असताना वणव्यांमुळे हजारो झाडे, पक्षी, प्राणी यांची हानी झाली आहे. वन व पर्यावरण खात्यांनी या संदर्भात अद्यापही उपाययोजना केलेल्या नाहीत. वणव्यांची कारणे शोधून, तातडीने या प्रकाराची चौकशी करावी, दोषींविरुद्ध गुन्हे नोंदवावेत, जिल्ह्यातील किल्ल्यांवर संबंधित खात्यांनी बंदूकधारी गडरक्षक, वनरक्षक नेमावेत, या मागण्यांचे निवेदन शिवकार्य गडकोट मोहीम या संस्थेच्या वतीने अप्पर जिल्हाधिकाऱ्यांसह विभागीय वनाधिकारी एस. जी. घुले यांना देण्यात आले.

जिल्ह्यातील गडकिल्ल्यांचा ऐतिहासिक वारसा जतन व्हावा, किल्ल्यांवरील पर्यावरण अबाधित रहावे यासाठी कार्यरत शिवकार्य गडकोट मोहिमेच्या वतीने राज्याचे वन व पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनाही निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात दुर्गसंवर्धन मोहिमांदरम्यान आढळून आलेली वस्तुस्थिती मांडण्यात आली आहे.

कळवण तालुक्यातील अचलागडच्या माथ्यावर लागलेल्या वणव्यात ८० टक्के पठार बेचिराख झाल्याचे दिसून आले. किल्ल्यावर पाणी व सावलीअभावी सरावैरा धावणारी माकडे आढळली. असेच दृश्य रामशेज किल्ल्यावर दिसले. किल्ल्याच्या पूर्वेला पायथ्याशी लागलेल्या वणव्यात लहान झाडी व गवत जळाले.

घोटीसह जिल्ह्यातील अनेक डोंगरांवर वणवे लागण्याच्या घटना घडल्या आहेत. वन, पर्यावरण, पर्यटन, पुरातत्व विभागाने वणवे टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात. त्यासाठी दुर्गसंवर्धन संस्था, पर्यावरण संस्थांची बैठक घ्यावी अशी सूचना अप्पर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे यांना करण्यात आली.

त्यांनी या संदर्भात १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभांमध्ये वणवेमुक्त गाव परिसराचा ठराव ठराव करण्याबाबत निर्देश देण्यात येतील असे सांगितले. वनाधिकारी घुले यांनी यापुढे वणवे टाळण्यासाठी सर्वानी मिळून चच्रेतून पर्यायी उपाय सुचविल्यास वन विभाग अशा सूचनांचा सकारात्मक स्वीकार करेल, अशी ग्वाही दिली.