प्रभाग क्रमांक तीनमधील मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात तर एकमध्ये निम्मी नावे इतर प्रभागांमधील

महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष उमेदवार निश्चिती आणि प्रचाराच्या तयारीत गुंतले असताना ज्या मतदारांच्या जोरावर उमेदवारीचा दावा केला जात आहे, अशा मतदारांच्या याद्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर त्रुटी असल्याचे समोर येत आहे. नेहमीच्या प्रभागातील मतदारांची नावे दुसऱ्याच प्रभागात जोडण्यात येणे, याद्यांमध्ये केवळ आडनावाचा उल्लेख असणे व पत्ता गायब असणे असे अनेक प्रकार करण्यात आले आहेत. मतदार याद्यांमधील घोळ लक्षात घेता सर्व ३१ प्रभागांमधील मतदार याद्यांची पुनर्रचना करण्याची मागणी म्हसरूळ येथील कृषितज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते पद्माकर मोराडे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

महापालिका निवडणुकीसाठी तीन फेब्रुवारी ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. या मुदतीच्या आत सर्व उमेदवारांची नावे निश्चित करण्याचे आव्हान प्रमुख राजकीय पक्षांसमोर आहे.

त्यातच काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात आघाडी होईल किंवा नाही, शिवसेना-भाजप स्वतंत्र लढणार की स्वबळ आजमाविणार हा घोळ सुरू आहे. असे असले तरी काही जणांनी आपली उमेदवारी गृहीत धरून प्रचाराला सुरूवातही केली आहे. मतदानाच्या दिवशीची पूर्वतयारी म्हणून इच्छुकांनी आपल्या प्रभागातील मतदार याद्यांचा अभ्यास सुरू केला असता याद्यांमध्ये अनेक त्रुटी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

म्हसरूळ परिसराचा समावेश असलेल्या प्रभाग क्रमांक एकमध्ये एकूण मतदारांची संख्या २५ हजार ३९५ असून त्यापैकी १३ हजार ४५० पुरूष, तर ११ हजार ९४५ महिला असे वर्गीकरण आहे. या प्रभागातील मतदार याद्यांमध्ये शहरातील इतर भागांमध्ये राहणाऱ्या १२ हजारपेक्षा अधिक मतदारांचा समावेश करण्यात आला असल्याचा घोळ मोराडे यांनी निवडणूक आयोगासमोर सादर केला आहे.

जुने नाशिक मतदार यादी क्रमांक १२०-१, नाशिकरोड परिसर १२१- एक ते तीन, जेलरोड परिसर १७८-५, २०३-१ याशिवाय सातपूर, मध्य नाशिकमधील मतदारही प्रभाग क्रमांक एकच्या यादीत टाकण्यात आले आहेत. तिवंधा, तिडके कॉलनीतील प्रत्येकी एक हजार मतदारांची नावे या यादीत आहेत. ही संख्या याप्रमाणेच कमी-अधिक प्रमाणात इतर भागातीलही आहेत. पन्नास टक्क्य़ांपेक्षा अधिक मतदार हे इतर भागातील जोडले गेले असल्याचा आक्षेप मोराडे यांनी घेतला आहे.

महापालिकेच्या सर्व ३१ प्रभागांमध्ये मतदार याद्यांत असेच घोळ असून या याद्यांवर हरकत नोंदवित त्यांची पुनर्रचना करण्याची मागणी मोराडे यांनी आयोगाकडे केली आहे. मतदार याद्यांमधील घोळ पाहून इच्छूक हादरले असून या याद्या कायम राहिल्यास बहुतांश मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता पंचवटीतील प्रभाग क्रमांक तीनमधील सरस्वतीनगर येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन अहिरे यांनी व्यक्त केली आहे. याद्यांमधील घोळ दूरूस्त न केल्यास मतदानाच्या टक्केवारीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

अहिरे यांनी जाहीर करण्यात आलेल्या मतदार याद्यांवर हरकत नोंदवली आहे. प्रभाग क्रमांक तीनमधील यादी भाग ६६ मधील १४६२ नावे प्रभाग क्रमांक दोनमध्ये टाकण्यात आली असल्याचे अहिरे यांनी नमूद केले आहे.

यादी भाग ६६ मधील अनुक्रमांक १५६९७ ते १६७४६ याप्रमाणे एकूण १०४९ आणि अनुक्रमांक ३२४७९ ते ३२८९२ याप्रमाणे ४१३ अशी एकूण १४६२ नावे प्रभाग क्रमांक दोनसाठी तयार करण्यात आलेल्या ६६ नंबर यादीमध्ये दिसत आहेत. हे सर्व रहिवासी प्रभाग तीनमध्ये राहत असतानाही त्यांची नावे प्रभाक क्रमांक दोनमध्ये कशी गेली, असा प्रश्न अहिरे यांनी उपस्थित केला आहे.

वास्तविक प्रभाग क्रमांक दोन आणि तीन यांची सिमारेषा पंचवटीतून जाणारा मुंबई-आग्रा महामार्ग ठरविण्यात आला आहे महामार्गाच्या डावीकडील भाग म्हणजेच गोपाळनगर, हिरावाडी, लक्ष्मीनगर, सरस्वतीनगर, धात्रक फाटा, वैद्यकीय महाविद्यालय असा सर्व भाग प्रभाग क्रमांक तीनमध्ये, तर महामार्गाच्या उजवीकडील भाग म्हणजेच हनुमाननगर, आडगाव, विडी कामगारनगर हा प्रभाग क्रमांक दोनमध्ये आहे. अशी अतिशय सुटसुटीत रचना असतानाही डावीकडील मतदारांची नावे उजवीकडील दुसऱ्या प्रभागात जोडली गेल्याबद्दल अहिरे यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

याशिवाय प्रभाग क्रमांक तीन आणि दोनमधील यादीत अनेक मतदारांच्या केवळ आडनावांचा उल्लेख आहे. त्यांचा पत्ताही नाही. हे मतदार नेमके कोणते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुरूस्त करून यादी नव्याने जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

प्रभाग क्रमांक एकमधील मतदार यादीत पन्नास टक्क्य़ांपेक्षा अधिक नावे इतर भागातील मतदारांची जोडली गेली आहेत. याचाच अर्थ सर्वच प्रभागांमधील मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ असून त्यांची पुनर्रचना केल्याशिवाय निवडणूक घेण्यात येऊ नये.

-पदमाकर मोराडे, म्हसरूळ

आम्ही प्रभाग क्रमांक तीनमधील साईनगर भागात राहत असतानाही आमचे नाव प्रभाग क्रमांक दोनमध्ये टाकण्यात आले आहे. हा याद्यांमधील गलथानपणा असून याद्यांमध्ये दुरूस्ती करण्यात यावी.

-ज्ञानेश्वर सोमासे, साईनगर, पंचवटी

प्रभाग क्रमांक तीनमधील अनेक मतदारांची नावे प्रभाग क्रमांक दोनमध्ये जोडण्यात आली आहेत. याशिवाय बहुतेक मतदारांच्या केवळ आडनावांचा उल्लेख असून त्यांचा पत्ताही देण्यात आलेला नाही. त्यामुळे कोणता मतदार, हे कळणार कसे ? याद्या दुरूस्त न केल्यास मतदानाच्या टक्केवारीवर त्याचा परिणाम होईल.

-सचिन अहिरे, सरस्वतीनगर, पंचवटी