रस्ता दुरूस्तीमुळे वाहतूक मार्गात बदल
शहरातील मध्यवर्ती असलेल्या रविवार कारंजा ते महाबळ चौक या रस्त्याचे कॉक्रिटीकरण करण्यात येणार असल्याने हा मार्ग सात फेब्रुवारीपासून सर्व प्रकारच्या वाहनांसाठी तीन महिन्यांकरिता बंद करण्यात येत असल्याची माहिती वाहतूक शाखेचे शहर पोलीस उपायुक्त विजय पाटील यांनी दिली आहे.
रविवार कारंजा ते महाबळ चौक या रस्त्याचा सद्यस्थितीत रविवार कारंजाकडून येण्यासाठी एकेरी वापर केला जात आहे. परंतु, या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार असल्याने हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या रस्ता दुरूस्तीमुळे निमाणीकडून सीबीएसकडे येणाऱ्या वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत. निमाणीकडून सीबीएसकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनधारकांनी पंचवटी कारंजा-मालेगाव स्टँड-रविवार कारंजा-शनि चौक-अशोकस्तंभ-मेहेर सिग्नलमार्गे सीबीएस या मार्गाचा अवलंब करावा. तसेच निमाणीकडून शालिमारकडे जाणाऱ्या सर्व वाहनधारकांनी पंचवटी कारंजा-मालेगाव स्टँड-रविवार कारंजा-शनि चौक-अशोकस्तंभ-मेहेर सिग्नल-एमजी रोड-सांगली बँक सिग्नल-नेहरू गार्डनमार्गे शालिमार या मार्गाचा अवलंब करण्याची सूचना करण्यात आली आहे.
निमाणीकडून येणाऱ्या वाहतुकीच्या या बदलामुळे सीबीएसकडून निमाणीकडे जाणाऱ्या वाहतूक मार्गातही बदल करण्यात आले आहेत. सीबीएसकडून जाणारी सर्व वाहने-मेहेर सिग्नल-अशोकस्तंभ-सिद्धेश्वर मंदीर-रामवाडी-मखमलाबाद नाका-पेठफाटा-दिंडोरी नाकामार्गे निमाणीकडे जातील. त्यामुळे सध्या दुहेरी वापर होत असलेल्या या मार्गावरील वाहतूकही एकेरी होणार आहे. रामवाडीकडून अशोकस्तंभकडे जाणारा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद
ठेवण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी हे बदल करण्यात आले असून वाहनधारकांनी सहकार्य करण्याचे आवाहन विजय पाटील यांनी केले आहे.