शहरातील विविध संस्था व संघटना, राजकीय पक्ष यांच्या वतीने कामगार दिनाचे औचित्य साधत उत्कृष्ठ काम करणाऱ्या कामगार व कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. यानिमित्ताने आयोजित सोहळ्यांमध्ये मान्यवरांकडून कामगारांचे गुणगान गाण्यात आले. कामगारांसाठी विविध स्पर्धाचेही आयोजन काही संघटनांकडून करण्यात आले होते.
कालिका मंदिर ट्रस्ट व क्रीडा साधना यांच्या वतीने कालिका मंदिर सभागृहात आयोजित कार्यक्रमात आपल्या नियमित कामानंतर क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे
योगदान देणाऱ्या कामगारांना गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये सोनाली आंबिलवादे (शासकीय सेवा), काशिनाथ साळवे, तानाजी पाटील (व्हीआयपी कंपनी), दीपक लोखंडे (मनपा), विलास गांगुर्डे, शिरीष खाडे (नोट प्रेस), मनोज म्हस्के (जिल्हा परिषद), शरद पाटील (सिएट), सदाशिव नाईक, चेतन पनेर आणि अंबादास जगताप (बॉश), चंद्रकांत सूर्यवंशी (महेंद्रा), जगन तिडके ( क्रॉम्प्टन) यांचा समावेश आहे. प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक राजेंद्र बागूल, यशवंत व्यायाम शाळेचे अध्यक्ष दीपक पाटील, उद्योजक रमेश पवार, कालिका मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष केशव पाटील, खजिनदार सुभाष तलाजिया, अशोक दुधारे आदी उपस्थित होते. सत्कारार्थीतर्फे आंबिलवादे यांनी इतरांनीही आपले काम सांभाळून सामाजिक कार्याची धुरा वहावी, असे आवाहन केले. यावेळी नाशिकच्या जम्परोपच्या खेळाडुंनी प्रात्यक्षिक सादर केले. जम्मु-काश्मिरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्पध्रेसाठी निवड झाल्याबद्दल अनिमेश भावसार, आयुष मानकर यांचा सत्कार करण्यात आला.
शिवसेनेच्या वतीने मध्यवर्ती कार्यालयात संयुक्त महाराष्ट्राच्या हुतात्म्यांना अभिवादनानंतर महानगरातील रिक्षाचालक, मनपा सफाई कामगार यांसह विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी महानगरप्रमुख अजय बोरस्ते, जयंत िदडे, नितीन विखार, अ‍ॅड. नीलेश कुलकर्णी, रवींद्र जाधव, शिवाजी भोर आदी उपस्थित होते. तरुणांना रोजगार व व्यापार संधी उपलब्ध करुन देण्यासाठी शिवसेना, महिला आघाडी, युवा सेना, लोकाधिकार समिती, भारतीय कामगार सेना संयुक्तपणे कार्य करतील, समिती नेमून विविध विषयांचा अभ्यास करतील, असे महानगरप्रमुख बोरस्ते यांनी सांगितले. शिवसेना अखंड महाराष्ट्र ठेवण्यास कटिबध्द असल्याचेही त्यांनी नमूद केले.
शहरातील नमस्कार फाऊंडेशनच्या वतीनेही चोवीस तास सेवेत असणाऱ्या पोलीस, एसटी महामंडळ, अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
पोलीस, अग्निशमन, एसटी महामंडळ कर्मचारी चोवीस तास काम करत असतात. या कर्मचाऱ्यांना कोणत्याही सण, उत्सवानिमित्त सुटी मिळत नाही. नागरिकांच्या सेवेसाठी ते सतत तत्पर असतात. त्यामुळे त्यांच्या कामाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची गरज असल्याने कामगार दिनाचे निमित्त साधत या कामगारांचा सत्कार करण्यात आला असल्याची माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष हर्षल खैरनार यांनी दिली. अंबड येथील मधुकर बागूल यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी फाऊंडेशनचे विशाल खैरनार, आकाश तोटे, पंकज बच्छाव, राहुल गुंजाळ आदी उपस्थित होते.